Breaking

Post Top Ad

मंगळवार, १४ जुलै, २०२०

कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर

कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर

यवतमाळ : दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात या विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर राहून काम करीत आहे. यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तालुकास्तरीय यंत्रणेचा रोज आढावा घेत आहे. जिल्हाधिका-यांनी दोन्ही दिवस नियोजन सभागृहात वेगवेगळ्या तालुक्यांच्या बैठकी घेऊन उपायोजनेसंदर्भात माहिती घेतली. 
जिल्हाधिका-यांनी सोमवारी यवतमाळ, दिग्रस, पुसद, वणी, राळेगाव, केळापूर या तालुक्यांचा तर आज (दि.१४) रोजी उमरखेड, महागाव, नेर, दारव्हा, आर्णी, बाभुळगाव, कळंब, घाटंजी आणि मारेगाव तालुक्यांचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, नगर पालिका व ग्रामीण क्षेत्रात नागरिकांचा सर्व्हे अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. 
आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी तपासणी पथकाला नियमित मार्गदर्शन करून तपासणीदरम्यान आढळणा-या बाबींच्या व्यवस्थित नोंदी ठेवायला सांगावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत सर्वांना अवगत करावे. नोंदी घेतांना हाय रिस्क व लो रिस्क काँटॅक्टची वेगवेगळी यादी तयार करावी. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जलजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अत्यंत गांभिर्याने सर्व्हे करावा. ग्रामस्तरीय समित्यांची रचना नव्याने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांनी त्वरीत ग्रामस्तरीय समित्यांची बैठक बोलवावी. 
वाहतुकीसाठी आवश्यक पास असल्याशिवाय पोलिसांनी कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. तसेच जिल्ह्याच्या सीमेवर २४ बाय ७ गस्त ठेवावी. कोरोनाची लक्षणे नसलेले पण पॉझेटिव्ह आलेले नागरिक यानंतर आता संबंधित कोव्हीड केअर सेंटरमध्येच राहणार आहे. त्यामुळे तेथे त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तर पोलिस अधिक्षक एम. राजकुमार म्हणाले, आता संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठ केवळ चार तास उघडी राहणार आहे. अधिकाराचा वापर करून अनावश्यक बाहेर फिरणा-यांवर कारवाई करा. तसेच आपल्या वागणुकीमुळे नवीन काही समस्या निर्माण होणार नाही, याचीसुध्दा काळजी घ्यावी. मात्र नागरिकांवर वचक ठेवावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी कोरोनाबाधित रुग्णांची सविस्तर माहिती, हाय व लो रिस्क काँटॅक्टची माहिती, पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण, आयएलआय व सारीची लक्षणे असलेले नागरिक, फिवर क्लिनीक, मोबाईल फिवर क्लिनीक, सीसीसी सेंटर, ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात येत असलेली कामे, बाहेर जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, शासकीय आदेशाचे पालन न करणे इत्यादीबाबत केलेली कार्यवाही, आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण यांच्यासह संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, ठाणेदार आदी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad