यंदा परीक्षा दोन आठवडे आधी; परिपत्रक जाहीर
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या 2026 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.
यंदा परीक्षा नेहमीपेक्षा दोन आठवडे आधी घेण्यात येणार असून, शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार, बारावी (HSC) बोर्डाच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 मंगळवार पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 रोजी संपणार आहेत.
यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील समाविष्ट आहेत. दरम्यान, 12 वीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येतील.
दहावी (SSC) बोर्डाची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 शुक्रवार पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 (बुधवार) रोजी संपणार आहे. तर दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होतील.
शासनाच्या म्हणण्यानुसार, या वर्षी परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर करण्यामागे विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणावर नियंत्रण आणणे आणि अभ्यास नियोजन सुलभ करणे हा हेतू आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना पुरेसा वेळ मिळावा आणि विद्यार्थ्यांना तयारीसाठी नियोजन करता यावे यासाठी हाच निर्णय घेण्यात आला आहे.
मंडळाच्या सर्व नऊ विभागीय कार्यालयांमार्फत पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.” यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गाने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
12 वी परीक्षा : 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
10 वी परीक्षा : 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
12 वी प्रॅक्टिकल : 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026
10 वी प्रॅक्टिकल : 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026
SSC HSC Exam Dates 2026