धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंना कडक इशारा
अहिल्यानगर : वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट इशाराच दिला आहे. “वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील पार्थडी शेवगाव येथे वंजारी बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांशी फोनवरून संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी ही भूमिका मांडली.
मुंडे म्हणाले, “आम्हाला आधीच माहिती होतं की आम्ही एसटीमध्ये आहोत. परळी तालुका तेलंगणाच्या सीमेवर आहे आणि तिकडचे अनेक बांधव एसटी प्रवर्गात आहेत, तर आपण व्हीजेएनटीमध्ये आहोत हे दुर्दैव आहे. पण आम्ही कधीच हा विषय काढला नाही, कारण दोन टक्क्यातही चांगलं चाललं होतं. मात्र आता जर हैदराबाद गॅझेटनुसार इतरांना फायदा होत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळालाच पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “ताकाला जाणं आणि भांडं लपवणं हा आमचा स्वभाव नाही. हैदराबाद गॅझेटमधील जर एका-एका शब्दाचा फायदा होत असेल, तर तो आम्हालाही झाला पाहिजे. पण आता काही जण दोन टक्के आरक्षण काढा म्हणत आहेत, तर त्यांचा टक्काही शिल्लक ठेवणार नाही. इथून पुढे लढा आमचा आहे आणि सरकार आमच्यासोबत आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे.”
धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनीही या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर त्याला गुलामाचं गॅझेट म्हणणारे आता त्यातला फायदा दिसायला लागल्यावर काहीही चिवडत आहेत.”
या घडामोडीनंतर वंजारी आरक्षणाचा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची चिन्हं दिसत आहेत.
Dhananjay Munde warning Manoj Jarange