चांगले नेते पुढे यायला हवेत - अमृता फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राजकारणाविषयी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी आजच्या राजकारणाची स्थिती, नेत्यांची जबाबदारी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राजकारणाचे खरे उद्दिष्ट यावर थेट भाष्य केले.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्या हस्ते नित्यानंद स्वामी यांच्या “गीता” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “गीता आपल्याला जगण्याचे सार शिकवते. आध्यात्मिक कसे राहावे, सात्विकतेने जीवन कसे जगावे आणि स्वतःला कसे घडवावे हे या पुस्तकातून शिकायला मिळते. सध्याच्या काळात अशी पुस्तके वाचली पाहिजेत. गीता हे फक्त धार्मिक नव्हे तर जीवनमार्गदर्शक ग्रंथ आहे.”
राजकारणावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “राजकारण हे लोककल्याणासाठी असतं. महाभारत का झालं, कारण ते राज्यासाठी आणि चांगल्या शासनासाठी आवश्यक होतं. आजच्या काळात चांगले नेते पुढे आले पाहिजेत आणि त्यांनी जनतेची खरी सेवा करावी. देश आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर नेत्यांनी लोककल्याणाच्या दिशेने काम केलं पाहिजे. पण दुर्दैवाने आता बिलो द बेल्ट राजकारण सुरू झालं आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
त्या पुढे म्हणाल्या, “देवेंद्रजी हे मर्यादा पुरुष आहेत. त्यांना काय करायचं, कसं करायचं हे ठाऊक आहे. ते महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि लोककल्याणाचं काम ते न थकता करत असतात. कोणी अपमान करो, दगड मारो, पण लोकांची भलाई होत असेल तर देवेंद्रजी त्या दिशेने काम करत राहतात.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही अमृता फडणवीस यांनी भाष्य करताना सांगितलं, “तो दोन भावांचा प्रॉब्लेम आहे. ती त्यांची घरगुती बाब आहे. आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं. कोण कुठे जातंय, काय करतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. देवेंद्रजी हे कल्याणकारी नेते आहेत आणि ते कोणत्याही पदावर असले तरी लोककल्याणाचं काम करत राहतील.”
Good leaders come forward - Amruta Fadnavis