Breaking

Post Top Ad

मंगळवार, ७ जुलै, २०२०

यवतमाळ येथील पुनर्वनीकरण प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी- वनमंत्री संजय राठोड


यवतमाळ येथील पुनर्वनीकरण प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी- वनमंत्री संजय राठोड  खाजगी व अशासकीय संस्थांच्या सहभागातून अवनत वनक्षेत्राचे पुनर्वनीकरण करण्याचा  यवतमाळ येथील प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. त्रिपक्षीय करारअंतर्गत यवतमाळ वनविभाग, प्रयास आणि दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या 10 हेक्टरवर रोपवनाचा शुभारंभ वनमंत्री संजय राठोड आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपनाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,  जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, वनसंरक्षक रवीन्द्र वानखडे, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, विभागीय वनअधिकारी आर. व्ही. गोपाल, प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय कावलकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

राष्ट्रीय वन नीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाच्छादनाखाली असणे आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री म्हणाले, वनांतर्गत असलेले क्षेत्र हे जैव विविधतेने लाभलेले असून त्याची जोपासना करण्यासाठी  वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत त्रिपक्षीय करार करून वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले. कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अशाप्रकारे स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण व चांगला उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक पर्यावरणप्रेमी व्यक्तीने यामध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे. अशा प्रकारचे उपक्रम इतर जिल्ह्यांमध्येही आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अवनत वनक्षेत्राचे पुनर्वनीकरण हाती घेण्याच्या धोरणानुसार शासनाने वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत केली आहे. यवतमाळ जिल्हयात कार्यरत प्रयास व दिलासा संस्थेच्या सहभागातून यवतमाळ वन विभागातील 10 हेक्टर वनक्षेत्राचे वनीकरण, त्रिपक्षीय करारअंतर्गत करण्याबाबतच्या प्रस्तावास 17 जून 2020 रोजी समितीने मान्यता दिली. त्यानुसार 26 जून रोजी उपवनसंरक्षक, यवतमाळ, प्रयास संस्था आणि दिलासा संस्था यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील सदर करार हा 2020-21 या आर्थिक वर्षामधील राज्यस्तरावरील पहिलाच मंजुर प्रस्ताव आहे. दिलासा संस्थेच्या सहकार्याने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प प्रयास संस्थेने केला आहे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, प्रयास संस्था आणि दिलासा संस्था यांचे सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad