Breaking

Post Top Ad

बुधवार, ८ जुलै, २०२०

..ही चिपळ्या वाजविण्याची वेळ आहे का?

..ही चिपळ्या वाजविण्याची वेळ आहे का?
चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहीमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाही. गेल्या काही दिवसा पासून सरकारमध्ये अंतर्गत विरोध असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नसल्याचं सांगत चर्चांवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावरून आता शिवसेनेनंदेखील विरोधकांवर निशाणा साधला आहे. “चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यातून माघार घेतली पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत,” असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल. 

काय म्हटलंय सामना अग्रलेखात
सध्या पावसाची रिपरिप सुरूच असते तशी बातम्यांची रिपरिप सुरू आहे. रिपरिप म्हणजे फक्त शिडकावा, वादळ वगैरे नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यास जर कोणी ‘शिष्टाई’, ‘मध्यस्थी’ वगैरे शब्दांचे अलंकार लावीत असतील तर ते अलंकार त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत.
“सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?,” असा सवाल करत शिवसेनेने विरोधकांवर टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर निशाणा साधला.

कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे व त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये. चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे व फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा असल्याचे 'सामना'च्या अग्रलेखातून केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad