Breaking

Post Top Ad

बुधवार, ८ जुलै, २०२०

`अखेर ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेतʼ

अखेर ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेला धक्का देणाऱ्या व महाविकास आघाडीत नाराजीनाट्याला कारणीभूत ठरलेले पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे. हे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.

पारनेरमधील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यातील अंतर्गत राजकारणातून नगर पंचायतीतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खुद्द अजित पवारांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते. ते विरोधी पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचा खुलासा आमदार लंके यांनी या प्रकरणावर केला होता. वरिष्ठांशी चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी या पक्षांतरामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

राज्यात खांद्याला खांदा लावून सरकार चालवणाऱ्या पक्षांमध्ये सरकार स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच रंगलेला हा फोडाफोडीचा खेळ चर्चेचा विषय बनला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घडामोडींमुळं कमालीचे नाराज झाले होते. आमचे फोडलेले नगरसेवक परत करा, असा निरोप ठाकरे यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर आज महत्त्वूपर्ण घडामोडी घडल्या. या नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले. तिथे प्रथम पवार आणि नंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले.

मधल्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळीही हा विषय निघाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आज या पाचही नगरसेवकांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. मंत्रालयात अजित पवार, मिलिंद नार्वेकर नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर पाठविण्यात आले. शिवसेनेच्या तालुका महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, नगरसेवक विजय वाघमारे, माजी आमदार विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे हेही मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. तिथं त्या पाच नगरसेवकांनी आपली बाजू मांडली असून नाराजीचे कारण स्पष्ट केले आहे. त्यावर चर्चा आणि काही उपाय सुचविल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार समन्वय ठेवण्याची जबाबदारी आता आमदार लंके आणि नार्वेकर यांच्यावर देण्यात आल्याची माहिती आहे. या आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना फोडल्याचा आरोप झाला. यासाठी आमदार लंके यांना जबाबदार धरण्यात आले. मात्र, यातून राष्ट्रवादी-शिवसेना संबंध बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर प्रकरण मिटविण्याची जबाबदारीही लंके यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार लंके यांनी या हालचाली केल्या असून त्याला यश आल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad