जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या हंगामात खताचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी ७ ते ८ हजार मेट्रिक टन युरिया अतिरिक्त उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. त्यांनी दि.२७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कृषी विभागाचा आढावा घेतला.
जिल्ह्यामध्ये धान पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. धान पिका व्यतिरिक्त इतरही पिक घ्यावे. असे आवाहन ना. वडेट्टीवार यांनी याठिकाणी केले तसेच धान पिकाला आणखी इतर पिके घेण्यासंदर्भात पर्याय शोधावा अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्यात. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस.एन.झा उपस्थित होते.
जिल्ह्यातील पिक विमा योजने संदर्भात माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी विषद केली. पिक विमा योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडून शेतकऱ्यांचा पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा. अशा सूचना संबंधितांना पालकमंत्री यांनी दिल्यात. जिल्ह्यामध्ये मत्स व्यवसाय वाढवण्यासाठी चालना देण्यात यावी व मत्स्य व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न करावे, याविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात भाताच्या रोवण्या शिल्लक असल्यामुळे खताचा मुबलक पुरवठा असून आणखी अतिरिक्त पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याच प्रकारची खताची टंचाई नाही. यापुढेही ती भासणार नाही. कृत्रीम टंचाई संदर्भात तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. धान रोवनी यंत्राची उपयोगीता वाढली आहे. त्यामुळे यासंदर्भातील अनुदान वाढवून अधिक प्रमाणात उपलब्ध करावे, असे निर्देश देखील त्यांनी संबंधित विभागाला दिलेत.
जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस.एन.झा यांनी जिल्ह्यातील पिक कर्ज विषयीची माहिती सादर केली. पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत तसेच पिक कर्जाची मुदत वाढविण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
