पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे दगड व्यावसायिक मिनार मंडल यांच्या घरातून सुमारे २० कोटी रुपयांची रोकड आणि १५ किलो सोने जप्त करण्यात आले. अवैध खाणकाम प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील दगड व्यावसायिक मिनार मंडल यांच्या घरावर करण्यात आलेल्या छाप्यात सुमारे २० कोटी रुपयांची रोकड आणि तब्बल १५ किलो सोने जप्त करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळपासून तपास यंत्रणांकडून नोटा मोजण्याचे काम सुरू होते, जप्त रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईनंतर मिनार मंडल पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या मुलीच्या गेल्या वर्षी झालेल्या आलिशान विवाहसोहळ्याचीही चर्चा रंगली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सूरी येथे झालेल्या या विवाहसोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, अभिनेत्री झरीन खान आणि प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर यांच्यासह अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. मोनाली ठाकूर यांनी विवाहसोहळ्यात सादरीकरणही केले होते. तसेच बंगाली चित्रपटसृष्टीतील अंकुश हाजरा, सुमित गांगुली आणि दर्शना बनिक यांच्यासह अनेक कलाकारांनीही उपस्थिती लावली होती.
या विवाहासाठी शहरातील आणि परिसरातील अनेक हॉटेल्स आरक्षित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्या वेळी या भव्य विवाहसोहळ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही प्रश्न उपस्थित केले होते.
मिनार मंडल यांचे नातेवाईक तुलु मंडल हे देखील दगड व्यवसायाशी संबंधित असून त्यांना तृणमूल काँग्रेसशी जवळीक असल्याचे बोलले जाते. गुरे तस्करी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना यापूर्वी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वीपर्यंत मिनार मंडल हे सरकारी बसचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून नातेवाईकांच्या दगड व्यवसायात प्रवेश केला आणि पुढे स्वतः मोठे व्यावसायिक बनले.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कथित अवैध दगड खाणकाम आणि त्यामुळे शासनाच्या महसुलाला झालेल्या नुकसानीच्या प्रकरणात सुरू असलेल्या व्यापक कारवाईचा हा भाग आहे. या जिल्ह्यात अवैध दगड उत्खनन आणि त्यासंबंधित आर्थिक व्यवहारांबाबत यापूर्वीही अनेकदा तपास करण्यात आला आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या रोकड आणि सोन्याच्या स्रोताचा तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
°°°°°