Diabetes : मधुमेहात औषधांची गरज केव्हा आहार-व्यायामाने होऊ शकतो नियंत्रणात`

 


मधुमेहाचे निदान झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला लगेच औषधांची गरज असतेच असे नाही. एम्स दिल्लीचे तज्ज्ञ डॉ. राजेश खडगावत यांनी टाइप-२ मधुमेहात आहार, व्यायाम आणि औषधे कधी आवश्यक ठरतात, याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

मुंबई : भारतात १० कोटींहून अधिक नागरिक मधुमेहाने (डायबिटीज) ग्रस्त आहेत. मात्र, योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकजण निदान होताच तातडीने औषधे सुरू करतात. प्रत्यक्षात प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाला सुरुवातीपासूनच औषधांची आवश्यकता असते असे नाही.  टाइप-२ मधुमेहामध्ये औषधे कधी सुरू करावीत आणि केवळ आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे कधी साखर नियंत्रणात राहू शकते, याबाबत तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

तज्ञांच्या मते, शरीरातील स्वादुपिंडातून (पॅन्क्रियाज) तयार होणारे इन्सुलिन हे हार्मोन अन्नातून मिळणाऱ्या ग्लुकोजचा योग्य वापर करण्यास मदत करते. इन्सुलिनचे उत्पादन कमी होणे किंवा शरीराला त्याचा प्रभावी वापर करता न येणे, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेहाची समस्या निर्माण होते.

मधुमेहाचे निदान करण्यासाठी प्रामुख्याने रँडम प्लाझ्मा ग्लुकोज (RPG), फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (FPG) आणि एचबीए१सी (HbA1C) या चाचण्या केल्या जातात. एचबीए१सी चाचणीद्वारे मागील तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण समजते.

टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांसाठी इन्सुलिन घेणे अत्यावश्यक असते. मात्र, टाइप-२ मधुमेह असलेल्या प्रत्येक रुग्णाला लगेच औषधे सुरू करण्याची आवश्यकता नसते. जर उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी १२६ ते १४० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर दरम्यान असेल आणि एचबीए१सी ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर सुरुवातीला आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर भर द्यावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणामुळे अनेक रुग्णांमध्ये साखरेची पातळी औषधांशिवायही नियंत्रणात येऊ शकते.

यासाठी आहारात कडधान्ये, प्रथिनयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि ज्वारी, बाजरीसारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच दररोज किमान ४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

मात्र, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करूनही रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढत राहिल्यास किंवा नियंत्रणात येत नसेल, तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावेत, असे सगळेच डॉक्टर रुग्णांना सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने स्वतःहून औषधे सुरू करणे किंवा बंद करणे टाळावे. मधुमेहाचे व्यवस्थापन हे प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यस्थिती, तपासणी अहवाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले पाहिजे.

°°°°°





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने