मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्यातील जमीन वाद प्रकरणात बागेश्वर महाराजांचे बंधू शालिग्राम गर्ग यांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार आणि मारहाणीच्या आरोपांप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे.
छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्यातील राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमीन वादातून झालेल्या कथित मारहाण आणि गोळीबार प्रकरणात बागेश्वर महाराजांचे बंधू शालिग्राम गर्ग यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अंकित मिश्रा यालाही ताब्यात घेण्यात आले असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना राजनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. राजनगर परिसरातील कोंडा गावातील मोतीलाल कुशवाहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या सहकाऱ्यांसह गावात असताना शालिग्राम गर्ग हे काही साथीदारांसह तेथे आले.
तक्रारदाराच्या आरोपानुसार, आरोपींनी आल्याबरोबर शिवीगाळ करत लाठी-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर तीन फेऱ्या गोळीबार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून त्यांची सत्यता आणि त्यातील घटनाक्रमाची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य पटले यांनी सांगितले की, शालिग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शालिग्राम गर्ग यांचे नाव यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये समोर आले आहे. त्यांच्यावर शस्त्र दाखवून धमकावणे, मारहाण करणे तसेच टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे आरोप यापूर्वीही झाले होते. मात्र, सध्याच्या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
°°°°°