मुंबईतील आर.सी. माहिम मुंबई पब्लिक स्कूलमध्ये स्नेहआशा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना सीड पेन्सिल्सचे वाटप करत पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि झाडांच्या संगोपनाचा संदेश देण्यात आला.
मुंबई : पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच दृढ व्हावी, तसेच शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्नेहआशा फाउंडेशनच्या पुढाकारातून आर.सी. माहिम मुंबई पब्लिक स्कूल (बीएमसी शाळा) येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हरित भविष्याचा संकल्प केला.
स्नेहआशा फाउंडेशनच्या संस्थापक सिद्धी जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिकता नसून निसर्गाशी आयुष्यभर जपायचे नाते असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः लावलेल्या रोपट्याची जबाबदारी स्वीकारून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या वनक्षेत्राचा उल्लेख करत 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या संकल्पनेला नागरिकांच्या सहभागामुळेच बळ मिळाल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, संवेदनशीलता, संयम आणि निसर्गाविषयी आदर निर्माण होतो, असेही सिद्धी जयस्वाल यांनी नमूद केले. झाड लावणे आणि त्याचे संगोपन करणे ही जीवनमूल्ये शिकवणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 'सीड पेन्सिल्स'. वापरून झाल्यानंतर जमिनीत लावल्यास त्यापासून रोपटे उगवते, ही संकल्पना विद्यार्थ्यांना विशेष भावली. साध्या पेन्सिलद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्याचा हा अभिनव प्रयत्न उपस्थितांच्या पसंतीस उतरला.
हा उपक्रम अधीक्षक (स्कूल), सिटी झोन स्नेहलता डुंबरे यांच्या सहकार्याने पार पडला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड़ माँ के नाम' या अभियानाचा उल्लेख करत प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले आणि लावलेल्या रोपट्यांची नियमित काळजी घेण्याची शपथ घेतली. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संरक्षणाची दीर्घकालीन जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देणारा ठरला.
लावलेली रोपे मोठी होण्यासाठी वेळ लागणार असला, तरी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दलची जपणूक आणि जबाबदारीची भावना याच दिवशी रुजल्याचे चित्र पाहायला मिळाले. 'आज पेन्सिल, उद्या रोपटे' या संकल्पनेतून छोट्या कृतीतून मोठा बदल घडवून आणण्याचा प्रभावी संदेश या उपक्रमाने दिला.
°°°°°