श्रावण 2026 मध्ये 17 ऑगस्ट रोजी तिसरा सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मीळ योग जुळून येत आहे. तब्बल 23 वर्षांनंतर निर्माण झालेल्या या शुभ संयोगाचे धार्मिक महत्त्व, पूजेचे मुहूर्त आणि श्रावण मधील चार सोमवारांची माहिती जाणून घ्या.
श्रावणमहिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र काळ मानला जातो. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 30 जुलैपासून होत असून 28 ऑगस्टपर्यंत हा पवित्र महिना राहणार आहे. यात तिसरा सोमवार विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 17 ऑगस्ट 2026 रोजी तिसरा सोमवार आणि नागपंचमीचा शुभ योग एकाच दिवशी जुळून येत आहे. तब्बल 23 वर्षांनंतर हा दुर्मीळ संयोग होत असल्याने धार्मिक दृष्टिकोनातून तो अत्यंत फलदायी मानला जात आहे.
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यापूर्वी 2003 मध्ये श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा असा योग जुळून आला होता. आता 2026 मध्ये पुन्हा हा संयोग निर्माण होत असल्याने शिवभक्तांसाठी याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. नागदेवता हे भगवान शंकरांच्या गळ्यात अलंकार म्हणून विराजमान असल्यामुळे सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्यास त्या दिवसाला सोमवती नागपंचमी असे संबोधले जाते. या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा, शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, गंगाजल, चंदन आणि बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
संपूर्ण सावन महिन्यात अनेक भाविक सोमवारचे व्रत पाळतात. शिवलिंगावर रुद्राभिषेक, जलाभिषेक करून बेलपत्र, शमीपत्र, भस्म आणि धतूरा अर्पण करण्याची परंपरा आहे. भगवान शंकराच्या नामस्मरणासह उपवास, जप आणि शिवपूजेला विशेष महत्त्व दिले जाते.
शुभ मुहूर्त - ब्रह्म मुहूर्त : पहाटे 4.24 ते 5.08अभिजित मुहूर्त : सकाळी 11.59 ते दुपारी 12.5, रवि योग : सकाळी 5.51 ते 8.04, सायंकाळी पूजेचा मुहूर्त : सायंकाळी 6.59 ते रात्री 8.0. चार सोमवार - पहिला : 3 ऑगस्ट 2026, दुसरा सोमवार : 10 ऑगस्ट 2026 तिसरा (नागपंचमी) : 17 ऑगस्ट 2026 चौथा सोमवार : 24 ऑगस्ट 2026
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराच्या आराधनेसाठी शुभ मानला जातो. मात्र यंदा तिसऱ्या सोमवारी नागपंचमीचा योग जुळून आल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. या दिवशी श्रद्धेने शिवपूजा, नागदेवतांची पूजा, व्रत आणि दानधर्म केल्यास सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
°°°°°