देशात पाण्याची कमतरता नसून नियोजनाचा अभाव असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदर्भातील पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्यांवर उपाय म्हणून ‘वॉटर ग्रीड’ संकल्पना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागपूर : देशात पाण्याची कमतरता नसून पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव हीच मोठी समस्या असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, दुष्काळी परिस्थिती आणि वाढती पाणीटंचाई यावर बोलताना त्यांनी देशात ‘वॉटर ग्रीड’ उभारण्याची गरज अधोरेखित केली. नागपुरात आयोजित ‘जलसंवाद आणि जलक्रांती परिषद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त या परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८ मे रोजी होणाऱ्या या परिषदेत अभिनेते नाना पाटेकर, आमिर खान, मकरंद अनासपुरे यांच्यासह देशभरातील जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील काही भागांमध्ये पुरेसा पाऊस आणि मुबलक पाणी उपलब्ध असते, तर काही भाग कायम दुष्काळाच्या छायेत असतात. त्यामुळे देशात जशा हायवे ग्रीड आणि पॉवर ग्रीडची व्यवस्था आहे, त्याच धर्तीवर ‘वॉटर ग्रीड’ उभारणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पुरस्थिती निर्माण होते, तेथील अतिरिक्त पाणी मोठ्या कालव्यांच्या माध्यमातून पाणीटंचाईग्रस्त भागांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवरील सहभागही महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. मोठे जलप्रकल्प सरकारने उभारावेत, मतदारसंघ पातळीवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा आणि गावागावात जलसंधारण ही लोकचळवळ बनली पाहिजे, असे ते म्हणाले. लाखो लोकांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच देशातील पाण्याच्या दुर्भिक्षाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या कामाचा उल्लेख करताना गडकरी यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांत संस्थेने विदर्भात जलसंधारण क्षेत्रात मोठे काम केले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी साडेतीनशेहून अधिक तलाव बांधण्यात आले असून त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. या तलावांमुळे परिसरातील भूजल पातळीतही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
तलाव खोदकामातून निघालेली माती रस्ते बांधकामासाठी वापरण्यात आली, त्यामुळे दुहेरी फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बुलढाणा जिल्ह्यातही अशाच पद्धतीने जलसंधारणाचे काम करण्यात आले असून त्यामुळे रस्ते निर्मितीसाठी माती उपलब्ध झाली आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमागे पाणीटंचाई हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगताना त्यांनी जलव्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली. योग्य नियोजन, जलसंधारण आणि पाण्याचे समतोल वितरण यांद्वारे देशातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
°°°°°