हंताव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. क्रूझ जहाजावर ३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर WHO ने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून हा विषाणू फुफ्फुस आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करतो.
नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर आता हंताव्हायरस नावाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका क्रूझ जहाजावर या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, संबंधित क्रूझ जहाजावर आतापर्यंत एकूण ८ जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. जहाजावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास आणि तीव्र अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळून आली होती. सध्या हे जहाज स्पेनमधील कॅनरी आयलंड्स येथे थांबवण्यात आले असून संक्रमित प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हंताव्हायरस प्रामुख्याने उंदीर आणि त्यांच्या मलमूत्र, लाळ किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातून पसरतो. मात्र या वेळी आढळलेल्या ‘अँडीज’ या विषाणूच्या प्रकारामुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा प्रकार मर्यादित परिस्थितीत माणसांकडून माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळेच क्रूझ जहाजावर हा संसर्ग वेगाने वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे उंदरांचे मानवी वस्त्यांमध्ये प्रमाण वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे हे प्राणी नव्या निवाऱ्यांच्या शोधात मानवी वस्ती, बंदरे आणि जहाजांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे हंताव्हायरसचा धोका वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, हा विषाणू कोरोनासारखा हवेतून सहज पसरत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हंताव्हायरसची सुरुवातीची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असल्यामुळे संसर्ग ओळखणे अवघड ठरते. रुग्णाला स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या, पोटदुखी आणि ताप अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र संसर्ग वाढल्यानंतर हा विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि रुग्णाला गंभीर श्वसनाचा त्रास सुरू होतो. काही प्रकरणांमध्ये मूत्रपिंडांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. या विषाणूचा मृत्यूदर तुलनेने जास्त असल्यामुळे वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी या विषाणूबाबत जनतेमध्ये भीती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हंताव्हायरसची तुलना कोविड-१९ महामारीशी करणे योग्य नाही. सध्या सामान्य नागरिकांसाठी या विषाणूचा धोका अत्यंत कमी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. टेड्रोस यांनी सांगितले की, या विषाणूमुळे जागतिक स्तरावर मोठी महामारी निर्माण होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून संबंधित जहाजावरील परिस्थितीही नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जहाजावरील इतर प्रवाशांमध्ये नवीन लक्षणे दिसून आलेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
हंताव्हायरससाठी अद्याप कोणतीही अधिकृत लस किंवा ठोस अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करणे आवश्यक मानले जाते. ऑक्सिजन सपोर्ट, शरीरातील द्रवांचे संतुलन आणि वैद्यकीय निरीक्षण याद्वारेच रुग्णाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. तज्ज्ञांच्या मते, स्वच्छता राखणे, उंदरांपासून दूर राहणे आणि दूषित जागांपासून सावध राहणे हाच सध्या या विषाणूपासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
°°°°°°