प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, सोन्यासह 8 लाखांची लूट, मोबाईल मध्ये धक्कादायक पुरावे !

 

 जळगावमध्ये प्रेमाच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरलची धमकी देत लाखोंची वसुली; आरोपी यश महेंद्र जैन अटकेत, मोबाईलमधून धक्कादायक पुरावे जप्त.

जळगाव : जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेल्या एका भीषण आणि संतापजनक गुन्ह्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चाळीसगाव येथील यश महेंद्र जैन या तरुणाने उच्चशिक्षित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे आणखी गंभीर चित्र उभे करत आहेत. आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात इतर काही तरुणींचेही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एका पीडितेपुरता मर्यादित नसून मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, तपास सुरू असून काही डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील सर्व डेटा, चॅट्स आणि व्हिडिओंची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू असून आणखी किती तरुणींना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले आहे, याचाही शोध घेतला जात आहे

दरम्यान, राज्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नाशिकमधील भोंदू प्रकरणानंतर आणि कोल्हापूरमधील तत्सम घटनेनंतर आता जळगावमधील या व्हिडिओ कांडाने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांना लक्ष्य करणाऱ्या अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी समाजातून होत आहे.

या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून “प्रेम” या शब्दाच्या आड लपलेल्या गुन्हेगारी मानसिकतेचा धक्कादायक चेहरा उघड झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने