शनि जयंती २०२६ ही १६ मे रोजी अमावास्येला साजरी होणार; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि शनि दोष, साडेसातीपासून दिलासा मिळवण्यासाठी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
न्याय आणि कर्मफळाचे अधिपती मानल्या जाणाऱ्या शनिदेवाच्या जन्मोत्सवाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले असून २०२६ मधील शनि जयंती १६ मे रोजी साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येला हा पवित्र दिवस येत असून धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी सूर्यदेव आणि छाया यांच्या संयोगातून शनिदेवाचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानला जातो
द्रिक पंचांगानुसार अमावास्या तिथीची सुरुवात १६ मे रोजी पहाटे ५ वाजून ११ मिनिटांनी होणार असून तिचा शेवट १७ मे रोजी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी होईल. त्यामुळे १६ मे हाच दिवस शनि जयंती आणि शनि अमावस्या म्हणून पाळला जाणार आहे. या दिवशी केलेली पूजा, जप आणि दान यांना विशेष महत्त्व असून शनि दोष, साडेसाती किंवा ढैय्या यांसारख्या समस्यांपासून दिलासा मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त मानला जातो.
शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळचा काळ पूजेसाठी सर्वाधिक शुभ मानला जातो. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर पश्चिम दिशेकडे तोंड करून शनिदेवाचे ध्यान करणे, शनि मंत्र किंवा स्तोत्राचा जप करणे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे ही पारंपरिक पद्धत मानली जाते. याशिवाय गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा धनदान करणे अत्यंत पुण्यकारक समजले जाते.
या दिवशी सात्विक आहार पाळणे आणि अनेकजण उपवासही करतात. श्रद्धेने आणि नियमाने केलेली शनि पूजा जीवनातील अडथळे कमी करण्यास मदत करते, अशी धार्मिक धारणा आहे. त्यामुळे शनि जयंती हा केवळ एक सण नसून कर्म, शिस्त आणि श्रद्धेची जाणीव करून देणारा दिवस म्हणूनही ओळखला जातो.
°°°°°


