मंत्री सावे यांच्या ओएसडीचा कहर; पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, मुलालाही बेदम मारहाण !

  

 मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्यावर पुण्यात पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न, मारहाण आणि धमकीचा गंभीर गुन्हा दाखल; मुलालाही बेदम मारहाण केल्याचा आरोप.

पुणे: पुण्यात सत्तेच्या गर्वातून उफाळलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी विजय धुलचंद कारंडे यांच्यावर स्वतःच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक दुखापत आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. “मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही” अशी उघड धमकी देत कारंडे यांनी पत्नीवर अत्याचार केल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

३० एप्रिल रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेत पत्नीने मोबाईलचा पासवर्ड विचारल्याच्या किरकोळ कारणावरून कारंडे संतापले आणि त्यांनी थेट बॅटने बेदम मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या भयावह प्रसंगात आपल्या आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या लहान मुलालाही त्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे. घरात घडलेला हा हिंसाचार इतका भीषण होता की पत्नी आणि मुलगा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः घराबाहेर पळाले.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कारंडे यांचे वर्तन संशयास्पद होते. त्यांनी पत्नीला मुंबईत सोबत नेले नाही आणि मुलांनाही पुण्यातच ठेवले. यामुळे निर्माण झालेल्या संशयातून पत्नीने मोबाईलमधील चॅट्सबाबत विचारणा केली, मात्र त्याचाच राग मनात धरून त्यांनी हा अमानुष हल्ला केला. यानंतर त्यांनी केवळ पत्नीच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्या. इतकेच नव्हे तर पत्नीच्या वडिलांकडून २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही समोर आला आहे.

या सर्व प्रकारानंतर पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला असून सध्या विजय कारंडे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. नांदेड येथील समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले कारंडे सध्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

सत्तेच्या जवळीकतेचा गैरवापर करत “कोणी काही करू शकत नाही” अशी भाषा वापरत घरातच दहशत निर्माण करणाऱ्या या घटनेने कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सत्तेचा माज आणि कायद्याची भीती नसल्याचे हे धक्कादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.


°°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने