Nitin gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जात आणि धर्माच्या राजकारणावर जोरदार टीका केली. विकासामध्ये कोणताही भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी श्रमिकांच्या योगदानाचाही गौरव केला.
नागपूर : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जात आणि धर्माच्या आधारावर होणाऱ्या राजकारणावर जोरदार टीका करत राजकीय नेत्यांना थेट इशारा दिला. “जो करेल जातीची भाषा, त्याला मारेन लाथ,” असे स्पष्ट शब्दांत वक्तव्य करत त्यांनी समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणावर प्रहार केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सध्या काही राजकीय नेते जात-पात आणि धर्माच्या नावावर समाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विकासाच्या राजकारणात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. हिंदू असो किंवा मुस्लिम, सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस एकाच दरात मिळतो, यावरून सरकारच्या योजनांमध्ये कोणताही धार्मिक किंवा जातीय भेदभाव नसल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी काही नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. मंचावर जातीय घोषणा देणारे अनेक नेते प्रत्यक्षात स्वतःच्या मुलांना किंवा कुटुंबीयांना राजकीय तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात. जनता आता अशा ढोंगी नेत्यांना ओळखू लागली आहे, असे ते म्हणाले. आपली भूमिका नेहमी स्पष्ट आणि ठाम असल्याचे सांगताना त्यांनी, “मी जे बोलतो ते ठामपणे बोलतो. मी सांगितलेली गोष्ट पूर्ण केली की नाही, हे विचारण्याची हिंमत कुणात नाही,” असेही नमूद केले.
कामगार दिनाच्या निमित्ताने बोलताना नितीन गडकरी यांनी देशाच्या विकासात श्रमिक वर्गाचे योगदान सर्वात मोठे असल्याचे सांगितले. देशातील रस्ते, इमारती, सिंचन प्रकल्प आणि मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्यात कामगारांच्या घामाचे आणि कष्टाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताचा विकास केवळ यंत्रांमुळे शक्य झालेला नसून लाखो कामगारांच्या अथक परिश्रमामुळे देश प्रगतीच्या मार्गावर पुढे गेला आहे, असे ते म्हणाले.
श्रमिक वर्ग हा देशाच्या विकासाचा कणा असून त्यांना सन्मान, चांगल्या सुविधा आणि उत्तम जीवनमान मिळाले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
°°°°°
