टरबूज खरेदीपूर्वी करा ‘कॉटन टेस्ट’; दोन सेकंदांत समोर येईल खरं-खोटं !

 

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या टरबूजांमध्ये केमिकल्स आणि कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ‘कॉटन टेस्ट’सह काही सोप्या उपायांनी खरे आणि बनावट तरबूज ओळखता येऊ शकते.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे फळ म्हणून टरबूजाला मोठी मागणी असते. बाजारात लाल, गोड आणि आकर्षक दिसणारे टरबूज पाहून अनेक जण ते लगेच खरेदी करतात. मात्र अलीकडच्या काळात काही व्यापाऱ्यांकडून टरबूज अधिक लाल आणि आकर्षक दिसावे यासाठी कृत्रिम रंग व केमिकल्सचा वापर केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. असे केमिकलयुक्त टरबूज आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे टरबूज खरेदी करण्यापूर्वी काही साध्या चाचण्या करून त्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे मानले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘कॉटन टेस्ट’ ही बनावट किंवा रंग मिसळलेल्या तरबूजाची ओळख करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत मानली जाते. यासाठी टरबूजाचा छोटा तुकडा कापून तो कोरड्या कापसावर किंवा पांढऱ्या कापडावर हलक्या हाताने घासावा. जर कापूस किंवा कापडावर गडद लाल रंग लागला, तर त्यामध्ये कृत्रिम रंग मिसळले असण्याची शक्यता असते. नैसर्गिकरित्या पिकलेल्या टरबूजाचा रंग सहजपणे बाहेर पडत नाही.

याशिवाय पाण्याची चाचणीही उपयुक्त ठरते. टरबूजाचा तुकडा स्वच्छ पाण्यात काही मिनिटांसाठी ठेवला असता पाण्याचा रंग गुलाबी किंवा लाल होत असेल, तर ते भेसळ किंवा रंग वापरल्याचे संकेत मानले जातात. नैसर्गिक तरबूज पाण्यात रंग सोडत नाही.

टरबूजाचा स्वाद आणि आतील पोत पाहूनही त्याची गुणवत्ता ओळखता येते. बाहेरून आकर्षक आणि आतून अतिशय लाल दिसणारे पण चवीला फिकट, विचित्र वास येणारे किंवा अतिशय पाणचट वाटणारे टरबूज केमिकलने पिकवलेले असू शकते. अशा फळांचे सेवन केल्यास पोटदुखी, ॲलर्जी किंवा इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

टरबूजाच्या खालच्या भागावरील ‘फिल्ड स्पॉट’ देखील महत्त्वाचा मानला जातो. हा भाग पिवळसर किंवा क्रीम रंगाचा असल्यास तरबूज नैसर्गिकरीत्या पिकलेले असल्याचे समजले जाते. मात्र तो भाग हिरवा किंवा पूर्ण पांढरा दिसत असल्यास फळ कच्चे तोडून नंतर कृत्रिम पद्धतीने पिकवले असण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या मते, टरबूजाचा देठही त्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती देतो. कोरडा आणि गडद रंगाचा देठ हे नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फळाचे लक्षण मानले जाते. तर हिरवा आणि ताजा देठ असलेले तरबूज अपूर्ण अवस्थेत तोडलेले असण्याची शक्यता असते.

टरबूजाच्या बाहेरील भागावर लहान छिद्रे, इंजेक्शनसारखे निशाण, असामान्य चमक किंवा भेगा दिसत असल्यास ग्राहकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच खरेदी केल्यानंतर दोन-तीन दिवसांतच तरबूज खराब होणे किंवा त्यातून दुर्गंधी येणे हे देखील केमिकल वापराचे संकेत मानले जातात.

उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी टरबूज उपयुक्त असले तरी केवळ बाह्य आकर्षण पाहून फळ खरेदी करण्याऐवजी त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

°°°°°




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने