रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका.
पुणे : रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र विविध संघटनांकडून विरोध झाल्यानंतर चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून या कालावधीत दंडात्मक कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात आयोजित वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. मराठी माणसाने एकत्र येऊन ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी “जिथे माती भुसभुशीत असते तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत” असे रूपक वापरत राज्यातील परिस्थितीवर टीका केली.
आपल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचा आरोप केला. बाहेरून येणाऱ्यांना मराठी शिकवण्याची वेळ का येते, त्यांच्या राज्यांतील परिस्थितीबाबत प्रश्न का विचारले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातच अशा प्रकारचे वाद वारंवार निर्माण होतात आणि राज्यकर्ते दबावाखाली वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेचा अवमान करण्याची कुणाची हिंमत होत नाही, मात्र महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली. मराठी माणूस एकत्र आल्यास परिस्थितीत बदल घडू शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी काही कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली असून राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे हा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
°°°°°
