पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळाजवळ सापडल्या जिलेटिन स्टिक्स, सुरक्षा यंत्रणा सतर्क !

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी कार्यक्रमस्थळाजवळ दोन जिलेटिन स्टिक्स आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास सुरू केला आहे.

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी मोठी खळबळ उडाली असून कार्यक्रमस्थळाजवळ दोन जिलेटिन स्टिक्स आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रविवारी सकाळी बंगळुरू शहराबाहेरील कागलीपुरा परिसरात ही स्फोटके सापडली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार होते त्या कार्यक्रमस्थळापासून हे ठिकाण अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असल्याने तपास यंत्रणांमध्ये मोठा हडकंप उडाला आहे.

पंतप्रधान मोदी हे श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’च्या कार्यक्रमासाठी बंगळुरूमध्ये आले होते. संस्थेच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणीदरम्यान जिलेटिन स्टिक्स आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्राप्त माहितीनुसार, बंगळुरू सेंट्रल रेंजचे डीआयजी यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी सुरू असलेल्या तपास मोहिमेदरम्यान फुटपाथलगत संशयास्पद स्वरूपातील दोन जिलेटिन स्टिक्स आढळल्या. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी परिसर तातडीने ताब्यात घेतला आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकासह फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू असून स्फोटके त्या ठिकाणी कशी पोहोचली, त्यामागे कोणाचा हेतू होता आणि हा कोणत्या मोठ्या कटाचा भाग होता का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयित हालचालींची माहिती गोळा केली जात आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच गुप्तचर संस्थांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांनी देशातील संवेदनशील ठिकाणी सतर्कता वाढवली होती. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, पोलिसांना बेवारस वस्तू, संशयास्पद हालचाली आणि पार्क केलेल्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

बंगळुरू पोलिसांनी या घटनेला अत्यंत गंभीरतेने घेतले असून तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यक्रमस्थळाभोवती सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्व सुरक्षा तपासणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. मात्र कार्यक्रमापूर्वी सापडलेल्या स्फोटकांमुळे देशभरात सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

°°°°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने