उद्योगविश्वातील दिग्गज विजयपत सिंघानिया यांचे निधन; ₹12,000 कोटींचे साम्राज्य !

 


रेमंड ग्रुपचे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचे 87 व्या वर्षी निधन. उद्योग, एव्हिएशन आणि वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या प्रवासातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

New Delhi : भारतीय उद्योगविश्वातील दिग्गज आणि Raymond Group चे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी संध्याकाळी मुंबईत ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र आणि रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून दिली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

४ ऑक्टोबर १९३८ रोजी जन्मलेल्या विजयपत सिंघानिया यांनी १९८० साली रेमंड समूहाची सूत्रे हाती घेतली आणि तब्बल तीन दशकांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड समूहाने वस्त्रोद्योगात मोठी झेप घेतलीच, पण परफ्यूमसह विविध क्षेत्रांत विस्तार करत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात त्यांनी कंपनीला जागतिक बाजारपेठेत नेले आणि ब्रँडची ताकद वाढवली.

व्यवसायासोबतच त्यांना विमानवाहतूक क्षेत्राची विशेष आवड होती. प्रशिक्षित वैमानिक म्हणून त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. २००५ साली त्यांनी हॉट एअर बलूनद्वारे २१,००० मीटरपेक्षा अधिक उंची गाठत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना भारतीय वायुदलाकडून ‘ऑनरेरी एअर कमोडोर’ ही मानद पदवी देण्यात आली होती.

उद्योग आणि विमानवाहतूक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २००६ साली त्यांना पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेण्यात आली होती.

एकेकाळी सुमारे १२,००० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले विजयपत सिंघानिया यांचे आयुष्य पुढील काळात मोठ्या वळणावर आले. मुंबईतील आलिशान जेके हाऊसमध्ये राहणारे हे उद्योजक २०१५ नंतर दक्षिण मुंबईतील भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडले, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात चर्चेची बाब ठरली.

२०१५ मध्ये त्यांनी रेमंड समूहाची धुरा आपल्या मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये मालमत्तेच्या वादावरून मतभेद निर्माण झाले. एका मुलाखतीत त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाला दिल्याचा पश्चात्ताप व्यक्त करत हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे चुकलेले पाऊल असल्याचे म्हटले होते.

विजयपत सिंघानिया यांच्या निधनाने भारतीय उद्योगविश्वातील एक प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले असून, त्यांच्या कार्याची छाप दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.

---------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने