‘सरगम म्युझिकोलॉजी कराओके क्लासेस’चे उद्घाटन पार पडले असून संगीतप्रेमींसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या पवित्र आणि मंगलमय क्षणी स्वरांच्या नव्या प्रवासाची सुरुवात होत ‘सरगम म्युझिकोलॉजी कराओके क्लासेस’चा भव्य आणि भावपूर्ण शुभारंभ संपन्न झाला. सुजाता सामल आणि अनिरुद्ध वरणगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने संगीतप्रेमींसाठी एक नवे, सुरमयी दालन खुले केले आहे.
या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुजाता सामल यांची समृद्ध संगीत पार्श्वभूमी. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचे सखोल ज्ञान, सातत्यपूर्ण साधना आणि अनुभव यामुळे या क्लासेसला एक मजबूत आणि कलात्मक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकण्याची संधी मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरणार आहे.
‘सरगम म्युझिकोलॉजी कराओके क्लासेस’चा उद्देश केवळ गाणे शिकवण्यापुरता मर्यादित नसून, खरे कलाकार घडवणे हा आहे. प्रत्येक गायक-गायिकेच्या कंठात दडलेली नैसर्गिक प्रतिभा ओळखून तिला योग्य दिशा देणे आणि त्या आवाजाला सुसंस्कारित करण्यावर येथे विशेष भर दिला जाणार आहे. संगीताच्या त्रिसूत्री मानल्या जाणाऱ्या ताल, सूर आणि लय यांचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना केवळ गाणी सादर करण्याची नव्हे, तर संगीत जगण्याची प्रेरणा दिली जाणार आहे.
कराओकेच्या माध्यमातून आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, मंचावर सादरीकरणाची भीती दूर करणे आणि श्रोत्यांशी भावनिक नाळ जोडण्याची कला आत्मसात करण्यावर या उपक्रमात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे हे क्लासेस केवळ संगीत शिक्षणापुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकासाचे एक प्रभावी केंद्र ठरणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर सुजाता सामल यांच्या स्वरातून साकारलेली सरस्वती वंदना उपस्थितांच्या मनात दिव्यता आणि शांततेची अनुभूती निर्माण करून गेली. कार्यक्रमाला सुमारे वीस गायक-गायिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संगीताविषयीची ओढ आणि नव्या प्रवासाची उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी अत्यंत नेटक्या आणि सुरेल पद्धतीने केले. संपूर्ण कार्यक्रमात एक सुसंवादी आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
‘सरगम म्युझिकोलॉजी कराओके क्लासेस’च्या या सुरेल प्रारंभाने संगीतप्रेमींसाठी एक नवा अध्याय सुरू झाला असून, या माध्यमातून उद्याचे सक्षम, संवेदनशील आणि आत्मविश्वासपूर्ण कलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
----------------------------------------


