डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रिबाई फुले यांची नावे देण्यास मान्यता,
सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील 448 शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय’ शब्द वगळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रिबाई फुले यांची नावे देण्यात येणार.
राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये मोठा बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये वापरला जाणारा ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्या वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
निर्णयानुसार राज्यातील एकूण 448 वसतिगृहांपैकी 416 वसतिगृहांच्या नावांमध्ये बदल करण्यात येणार असून यापुढे मुलांच्या वसतिगृहांना “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” तर मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करणारा असल्याने त्यातून विषमता अधोरेखित होते, अशी भावना व्यक्त होत होती. या शब्दामुळे संस्थांची ओळख विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्याच चौकटीत घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील हा शब्द वगळून समानतेचा आणि प्रेरणेचा संदेश देणाऱ्या महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या विभागांतर्गत एकूण 449 शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये 231 मुलांची आणि 218 मुलींची वसतिगृहे आहेत. या सर्व वसतिगृहांमध्ये एकूण 46,673 विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था उपलब्ध आहे. त्यापैकी 24,958 मुलांची आणि 21,715 मुलींची प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ही योजना राबविण्यात येत असून निवास व्यवस्था, नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी स्वच्छता भत्ता, गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहली, कार्यशाळा तसेच टीव्ही, ॲप ॲक्वागार्ड, वॉटर कुलर आणि अग्निसुरक्षा सुविधा पुरविण्यात येतात.
या निर्णयामुळे वसतिगृहांची ओळख अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी होईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------
