यूट्यूबची सेवा जागतिक स्तरावर काही काळ ठप्प; कंपनीने रेकमेंडेशन सिस्टीममधील बिघाड कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. भारतासह अनेक देशांवर परिणाम.
नवी दिल्ली : जगभरात लोकप्रिय असलेल्या YouTube ची सेवा अचानक काही काळासाठी ठप्प झाल्याने लाखो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भारत, अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये वापरकर्त्यांना होमपेजवर व्हिडिओ दिसत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. काही तासांच्या अडथळ्यानंतर कंपनीने अधिकृत स्पष्टीकरण देत सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आल्याची माहिती दिली.
यूट्यूब टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की, त्यांच्या रेकमेंडेशन सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे होमपेज, यूट्यूब ॲप, YouTube Music तसेच YouTube Kids यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ योग्यरित्या दिसत नव्हते. या तांत्रिक अडचणीमुळे वापरकर्त्यांना कंटेंट ॲक्सेस करण्यात अडथळे निर्माण झाले.
कंपनीने पुढे स्पष्ट केले की, होमपेज पुन्हा कार्यरत झाले असून संपूर्ण समस्या दूर करण्यासाठी तांत्रिक पथकाकडून काम सुरू आहे. लवकरच अधिक सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही यूट्यूब टीमने नमूद केले.
भारतात सकाळी सुमारे ५ वाजल्यापासून यूट्यूब डाउन असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. आउटेज ट्रॅक करणाऱ्या पोर्टल्सवर मोठ्या प्रमाणात रिपोर्ट्स नोंदवण्यात आल्या. विशेषतः अमेरिकेतच सुमारे तीन लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी सेवा बंद असल्याची नोंद केली होती.
दरम्यान, काही तासांतच सेवा पूर्ववत झाल्याचे दिसून आले. भारतात यूट्यूब पोर्टल आणि ॲप पुन्हा सुरळीतपणे कार्य करू लागले आहेत. रिपोर्ट्सची संख्या लक्षणीयरीत्या घटली असून बहुतेक वापरकर्त्यांना पुन्हा नियमितपणे व्हिडिओ पाहता येत आहेत.
मनोरंजन, संगीत, चित्रपट, शैक्षणिक व्हिडिओ आणि विविध माहितीपर कंटेंटसाठी यूट्यूब हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्यामुळे अल्पकाळाच्या या तांत्रिक बिघाडानेही जागतिक स्तरावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
----------------------------------------------
