शिवजयंतीनिमित्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार.
मुंबई : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ जाहीर करत राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या १५ महत्त्वाच्या सेवा एका दिवसात निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च, एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
महसूलमंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी महसूल विभागातील प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “प्रशासनाने लोकांकडे जाऊन सेवा द्यावी” हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानाची अंमलबजावणी महसूलमंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली होणार असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीत महसूल राज्यमंत्री तसेच विधान परिषदेचे दहा आमदार सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. या समित्यांना संपूर्ण राज्याचा आढावा, वेळापत्रक ठरविणे, धोरणात्मक निर्णय, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, अर्जदारांची यादी तपासणी, डेटा मॉनिटरिंग, जबाबदारी निश्चिती आणि दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या शिबिरांमधून प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, अकृषिक (NA) परवानगी, ‘सनद’ प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, पाणंद रस्त्यांच्या मान्यता आदेश, घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगीसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता अशा सेवा थेट शिबीर स्थळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
अभियानाच्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली जाणार आहे. मार्च महिन्यात ७ व १४ मार्च रोजी शिबिरे होणार आहेत. एप्रिलमध्ये १० व १७ एप्रिल रोजी शिबिरे आयोजित केली जातील. मे महिन्यात ८ व १५ मे रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर शिबिरे भरविण्यात येणार आहेत.
शिवजयंतीच्या प्रेरणेने सुरू होणारे हे अभियान प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करत सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. राज्यभर या उपक्रमाबाबत उत्सुकता व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------
