एसआयटीकडून चार्जशीट दाखल, अनंत गर्जे मुख्य आरोपी
गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी SIT कडून चार्जशीट दाखल; व्हॉइस रेकॉर्डिंगमधून “तू मर” म्हणत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक खुलासा.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने अखेर न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे माजी स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहेत.
एसआयटीच्या तपासानुसार, अनंत गर्जे याने पत्नी डॉ. गौरी पालवे यांचा केवळ शारीरिकच नव्हे तर सातत्याने मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या पुराव्यांनुसार, तो गौरी यांची सामाजिक बदनामी करण्याची धमकी देत होता आणि त्यांना सतत मानसिक दबावाखाली ठेवत होता. या सततच्या त्रासामुळेच डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणेकडून काढण्यात आला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी एक काळी डायरी जप्त केली असून, त्या डायरीत डॉ. गौरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना, मानसिक तणाव आणि पतीकडून होत असलेल्या छळाची सविस्तर नोंद केल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे. याशिवाय डिसेंबर 2024 मधील एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंगचा खुलासा. चार्जशीटमधील माहितीनुसार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजे घटनेच्या दिवशीच, अनंत गर्जे याने मुद्दाम स्वतः आणि गौरी यांच्यातील वादाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. या रेकॉर्डिंगमध्ये तो वारंवार गौरी यांना “तू मर” असे शब्द वापरत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या ऑडिओ क्लिप्स समाजात आणि नातेवाईकांमध्ये पसरवून गौरी यांची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत असल्याचाही आरोप चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी डॉ. गौरी यांनी आपली मैत्रीण डॉ. प्रणिता अस्वले हिला एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप्स पाठवल्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. या क्लिप्समध्ये त्यांनी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाची सविस्तर माहिती दिली होती. तपासात 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या हालचालींचाही तपशील देण्यात आला आहे. दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी डॉ. गौरी ‘बे-लीफ सैलून’मध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले असून, 3 वाजून 19 मिनिटांनी त्या बाहेर पडल्याचे नोंदले गेले आहे. मात्र, त्या दिवशी सैलूनच्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नसल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासणी आणि शेजारील स्किन स्पेशालिस्ट क्लिनिकच्या कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे गौरी यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली.
डॉ. गौरी पालवे यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मृत्यू पोस्टमार्टमच्या 12 ते 24 तास आधी झाला होता. मृत्यूचे कारण “Asphyxia following Hanging” म्हणजेच गळफासामुळे मृत्यू असे नमूद करण्यात आले आहे. एसआयटीने या घटनेची नोंद अप्राकृतिक मृत्यू म्हणून केली असून, तपासात मिळालेल्या ठोस पुराव्यांमुळे अनंत गर्जे यालाच मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणात शीतल आंधले (नणंद) आणि अजय गर्जे (दिर) यांच्याविरोधात छळाचे पुरेसे पुरावे न आढळल्याने त्यांना चार्जशीटमधून वगळण्यात आले असून, त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. चार्जशीटमध्ये अनंत गर्जे याने आपल्या पूर्वीच्या संबंधांची माहिती लपवून विश्वासघात केला, सतत अपमानास्पद शब्द वापरले आणि ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी मुंबईतील वरळी परिसरातील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पालवे कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत सखोल तपासाची मागणी केली होती. या प्रकरणाच्या तपासात आता एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येत असून, चार्जशीट दाखल झाल्याने या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले आहे.
______
