इराणसोबत व्यापार करणाऱ्यांवर अतिरिक्त टॅरिफची ट्रम्प यांची धमकी; भारतावर धोका, किती मोठा फटका बसणार?

 इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची ट्रम्प यांची धमकी. भारतावर एकूण 75 टक्के शुल्काचा धोका असून त्याचा निर्यातीवर किती परिणाम होईल याचा आढावा.

दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा  आक्रमक व्यापार धोरणाचा अवलंब करत टॅरिफ अस्त्र उगारले आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येईल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. इराणमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि वेनेझुएलावरील कारवाईनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी टॅरिफचा वापर पुन्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबावाचे साधन म्हणून सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम ब्राझील, चीनसारख्या देशांवर होणार असला तरी भारतालाही या नव्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून व्यापारी संबंध असून अन्नधान्य, औषधे, कृषी उत्पादने आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमधील व्यापार सुरू आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो.

सध्या भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर ट्रम्प प्रशासनाने आधीच 25 टक्के टॅरिफ लागू केला आहे. त्याचबरोबर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे भारतावर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारण्यात येत आहे. आता जर इराणसोबत व्यापार सुरू ठेवल्यास भारतावर आणखी 25 टक्के टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे. परिणामी, भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक वस्तूंवर एकूण टॅरिफ 75 टक्क्यांच्या घरात पोहोचू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढल्यास भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात कमी होईल. कापड, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी वस्तू, कृषी उत्पादने आणि आयटीशी संबंधित हार्डवेअर क्षेत्राला याचा थेट फटका बसू शकतो. अमेरिकेची बाजारपेठ भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने निर्यात कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

भारत आणि इराण यांच्यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 2.33 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. यामध्ये भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या दबावामुळे भारताने इराणसोबतचा व्यापार कमी केल्यास त्याचा परिणाम देशांतर्गत उद्योग, विशेषतः कृषी आणि औषध क्षेत्रावर होऊ शकतो. दुसरीकडे, इराणसोबत व्यापार सुरू ठेवल्यास अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय उद्योगांवर आर्थिक ओझे वाढण्याची शक्यता आहे.

एकीकडे धोरणात्मक स्वायत्तता जपण्याचा भारताचा प्रयत्न, तर दुसरीकडे अमेरिकेसोबतचे व्यापारी हितसंबंध सांभाळण्याचे आव्हान, अशा दुहेरी कोंडीत भारत अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ धमकीमुळे भारताच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


--------------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने