रोटी हा भारतीय आहाराचा कणा आहे, पण चुकीची रोटी आरोग्य बिघडवू शकते. ज्वारी, बाजरी, रागी, जौ, बेसन आणि मल्टीग्रेन रोटी कोणासाठी फायदेशीर? जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला.
भारतीय जेवणात रोटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक रोटी सारखीच फायदेशीर असेल असे नाही. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीत वजन वाढणे, मधुमेह, पचनाचे त्रास, कोलेस्ट्रॉल आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या वाढत आहेत. अशा वेळी योग्य धान्यापासून बनवलेली रोटी निवडणे अत्यंत गरजेचे ठरते. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्यांचे फायदे स्पष्ट करत असतात.
जौ म्हणजे जव, यव, सातू किंवा बार्ली ही घुलनशील फायबर आणि सेलेनियमने समृद्ध असून पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. ही रोटी इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारते तसेच लिव्हर आणि हृदयाच्या आरोग्यास आधार देते. प्रीडायबेटीस, फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या व्यक्तींनी जौची रोटी आहारात समाविष्ट करू शकतात.
रागीची रोटी कॅल्शियम, आयर्न आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही रोटी उपयुक्त ठरते. हाडे आणि सांधे मजबूत करण्यास मदत होत असल्याने मधुमेही रुग्ण, तसेच मेनोपॉजनंतरच्या महिलांसाठी रागीची रोटी फायदेशीर मानली जाते.
मल्टीग्रेन रोटीमध्ये विविध धान्यांचा समावेश असल्याने फायबर, बी-व्हिटॅमिन्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. ही रोटी पचनक्रिया सुधारते, गट हेल्थ संतुलित ठेवते आणि फॅट लॉसमध्ये मदत करते. पीसीओएस असलेल्या महिला तसेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मल्टीग्रेन रोटी योग्य पर्याय आहे.
बाजरीची रोटी आयर्न, झिंक आणि अघुलनशील फायबरने भरलेली असते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, सहनशक्ती सुधारते आणि आयर्नची कमतरता भरून निघते. अॅनिमिया असलेले रुग्ण आणि जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींनी बाजरीची रोटी नियमित खावी.
बेसनाची रोटी प्रथिने, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. ही रोटी इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते, फॅट लॉसला चालना देते आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते. मधुमेह, पीसीओएस आणि वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये बेसनाची रोटी फायदेशीर ठरते.
ज्वारीची रोटी फायबर, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. ती आतड्यांचे आरोग्य सुधारते, हृदयाच्या कार्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास सहाय्यक ठरते. पोट फुगणे किंवा उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या लोकांसाठी ज्वारीची रोटी उपयुक्त आहे.
ओट्सची रोटी घुलनशील फायबर आणि प्रथिनांनी भरलेली असते. ती पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते आणि रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी करते.
योग्य रोटीची निवड केल्यास रोजचा आहार अधिक संतुलित आणि आरोग्यदायी होऊ शकतो. मात्र, कोणताही मोठा आहारातील बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
[ या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही डाएट किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ]
--------------------------------
