मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत असून मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून राज्यभर महायुती, ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठीचे मतदान पार पडत असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होत आहे. शुक्रवारी, १६ जानेवारीला या सर्व महापालिकांचे निकाल जाहीर होणार असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर यांसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोण सत्ताधारी ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. गेल्या २५ वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता होती. यावेळी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये थेट लढत झाली असून, दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात येत आहे.
मुंबईत महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढताना दिसत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मैदानात उतरली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्र युती केली आहे. विकास, पायाभूत सुविधा, मराठी अस्मिता, मराठी महापौर आणि अदाणीकरण यांसारखे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. त्यामुळे मतदानानंतर मुंबईचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतही चुरशीचा सामना पाहायला मिळाला. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तर कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढत आहे. या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनी थेट आव्हान दिले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राजकीय गणिते वेगळी दिसली. पुण्यात भाजपाने १६५ जागांवर उमेदवार उभे केले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा थेट सामना रंगला. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट काही ठिकाणी एकत्र आलेले दिसले, ज्यामुळे लढत अधिक रंगतदार बनली.
विदर्भात नागपूर महापालिकेत भाजपाने सर्व १५१ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट सामना आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर महापालिकेत भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असा तिरंगी सामना पाहायला मिळाला. काही भागांत एआयएमआयएमचा प्रभावही दिसून आला.
अकोला, अमरावती आणि लातूर या शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात नाशिक, धुळे, जळगाव या शहरांमध्ये भाजप मजबूत स्थितीत असली तरी महाविकास आघाडीशी थेट लढत झाली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी यांचा संयुक्त प्रयोग लक्षवेधी ठरला आहे.
मुस्लिम बहुल शहरांमध्येही वेगळी समीकरणे दिसून आली. मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये समाजवादी पार्टी आणि एआयएमआयएम या पक्षांनी निवडणूक अधिक रंगतदार केली आहे. या शहरांमध्ये कोणाचा प्रभाव वाढतो, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
एकूणच २९ महापालिकांचे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे चित्र ठरवणारे नसून, आगामी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारे मानले जात आहेत. त्यामुळे १६ जानेवारीला जाहीर होणारे निकाल सर्वच प्रमुख पक्षांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
-----------------------------------
