व्हेनेझुएलात सोन्याची किंमत चहाच्या कपाइतकी स्वस्त?

 

पण भारतात किती सोने आणता येते, काय आहेत नियम

व्हेनेझुएलात सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे सांगितले जाते. मात्र भारतात परदेशातून किती सोने आणता येते, कस्टम ड्युटीचे नियम काय आहेत, याची सविस्तर माहिती.

मुंबई : ऐकायला विचित्र वाटेल, पण व्हेनेझुएलामध्ये सोन्याची किंमत भारतातील एका कप चहाच्या किमतीइतकी स्वस्त असल्याची चर्चा सध्या होत आहे. जगभरात, विशेषतः भारतात सोन्याचे दर उच्चांकावर असताना व्हेनेझुएला मात्र आर्थिक अनागोंदी, प्रचंड महागाई आणि राजकीय अस्थैर्यामुळे वेगळ्याच परिस्थितीत सापडला आहे. या देशात स्थानिक पातळीवर काढले जाणारे सोने थेट चलन विनिमय दरानुसार विकले जात असल्याने त्याची किंमत अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे.

व्हेनेझुएला सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. स्थानिक चलनाची किंमत मोठ्या प्रमाणात घसरलेली असून महागाईने उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे व्यवहार प्रामुख्याने स्थानिक स्तरावर होतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारभावाशी त्याचा थेट संबंध राहत नाही. त्यामुळे भारतीय रुपयांत पाहता व्हेनेझुएलातील सोन्याची किंमत अत्यंत कमी भासते.

सध्याच्या दरानुसार भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतिग्रॅम सुमारे १३,८२७ रुपये आहे. त्याच वेळी व्हेनेझुएलामध्ये भारतीय चलनात पाहिले असता, त्याच शुद्धतेच्या सोन्याची किंमत अवघी सुमारे १८१.६५ रुपये प्रति ग्रॅम असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, व्हेनेझुएलात सोने भारतातील एका साध्या चहाच्या कपाच्या किमतीत उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

मात्र, व्हेनेझुएलातून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणता येईल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारतीय कस्टम नियमांनुसार ड्युटी फ्री सोने तेव्हाच आणता येते, जेव्हा संबंधित प्रवासी किमान एक वर्ष परदेशात वास्तव्यास असतो. अशा परिस्थितीत पुरुष प्रवासी जास्तीत जास्त २० ग्रॅम, तर महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंत सोने भारतात ड्युटी फ्री आणू शकतात. ही सवलत केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू होते, सोन्याचे बार किंवा नाणी यावर ती लागू नाही.

जर एखादा प्रवासी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परदेशात राहिला असेल, तर त्याला एका प्रवाशामागे एक किलोग्रॅमपर्यंत सोने भारतात आणण्याची परवानगी आहे. मात्र यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागते. सध्याच्या नियमानुसार सोन्यावर ६ ते १५ टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी आकारली जाऊ शकते.

सोन्याची नाणी, बिस्कीट किंवा बार यावर कोणतीही ड्युटी फ्री सवलत दिली जात नाही. अशा स्वरूपातील सोन्यावर पहिल्या ग्रॅमपासूनच कर लागू होतो. तसेच हिरे, मोती किंवा अन्य मौल्यवान रत्ने यांनाही ड्युटी फ्री अलाऊन्स मिळत नाही.

जर प्रवाशाकडे असलेले सोने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर विमानतळावर रेड चॅनलद्वारे त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. ही घोषणा न केल्यास संबंधित सोने जप्त केले जाऊ शकते, मोठा दंड आकारला जाऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

 ______________

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने