संसदचे २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार असून १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : संसदच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्या असून संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. भारत सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदच्या दोन्ही सभागृहांना २०२६ च्या बजेट सत्रासाठी बोलावण्यास मंजुरी दिली आहे. हे अधिवेशन २८ जानेवारी २०२६ पासून सुरू होऊन २ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार असून त्यानंतर सुमारे महिनाभराची विश्रांती दिली जाईल. दुसरा टप्पा ९ मार्च २०२६ रोजी पुन्हा सुरू होऊन २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे.
या अधिवेशनात ३० जानेवारी रोजी संसदेची संयुक्त बैठक होण्याची शक्यता असून त्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेची बैठक होणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२६ रोजी, रविवारच्या दिवशी सादर केला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तसेच अर्थसंकल्पावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर संसद १३ फेब्रुवारी रोजी तहकूब होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी ९ मार्च रोजी पुन्हा अधिवेशन सुरू होईल. ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि त्यानंतरचा सप्ताहअखेर लक्षात घेता, अधिवेशन २ एप्रिल रोजीच समाप्त करण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पाद्वारे वित्त मंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०१७ नंतर केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा कायम ठेवली असून यंदाही तीच पद्धत अवलंबली जाणार आहे.
--------------------------------------
