मकर संक्रांत २०२६ ही १४ की १५ जानेवारी? पंचांगानुसार जाणून घ्या मकर संक्रांतीची खरी तारीख, पुण्यकाळ, महापुण्यकाळ आणि दान-स्नानाचा शुभ मुहूर्त.
सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करताच साजरा होणारा मकर संक्रांत सण उत्तरायणाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासनेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र २०२६ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारीला की १५ जानेवारीला, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार मकर संक्रांतीची खरी तारीख, पुण्यकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक ठरते.
पंचांगानुसार २०२६ मध्ये सूर्य १४ जानेवारी रोजी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. धार्मिक परंपरेनुसार मकर संक्रांतीची तिथी ही सूर्याच्या संक्रमणावर आणि पुण्यकाळावर आधारित असते. त्यामुळे यावर्षी मकर संक्रांत १४ जानेवारी २०२६ रोजीच साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुण्यकाळ सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांपासून सुरू होणार आहे.
यावर्षी मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपासून ते ९ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच गंगा स्नानासाठीचा शुभ काळ सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून ते १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात केलेले स्नान व दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. मकर संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो, अशी धार्मिक मान्यता असून विवाह, गृहप्रवेश यांसारख्या मंगल कार्यांवरील निर्बंधही याच दिवसापासून समाप्त होतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी किंवा शुभ मुहूर्तात स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळावेत, असे सांगितले जाते. त्यानंतर तांब्याच्या पात्रातून जल, लाल फुले, अक्षता आणि तीळ अर्पण करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. यावेळी ‘ॐ सूर्याय नमः’ किंवा ‘ॐ घृणि सूर्याय नमः’ या मंत्रांचा जप करणे फलदायी मानले जाते.
दानधर्माच्या दृष्टीने मकर संक्रांत अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या दिवशी काळे तीळ, गूळ, तांदूळ, वस्त्र किंवा धनाचे दान केल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. तसेच पितरांच्या स्मरणार्थ तर्पण करणेही उत्तम मानले जाते. सूर्यदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आदित्यहृदय स्तोत्राचे पठण, सात्त्विक आहार आणि संयम पाळण्याची परंपरा आहे.
एकूणच पंचांगानुसार २०२६ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी स्नान, दान आणि सूर्योपासना केल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
-----------------------------------------
