चीनमध्ये अवघ्या १३ हजार रुपयांत तयार झालेला ‘Are You Dead?’ अॅप व्हायरल ठरला असून त्याचे मूल्यांकन थेट १३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. साध्या कल्पनेतून उभा राहिलेला हा अॅप आता ग्लोबल स्टार्टअप बनण्याच्या मार्गावर आहे.
दिल्ली: चीनमध्ये काही दिवसांपूर्वी केवळ विचित्र नाव आणि साध्या कॉन्सेप्टमुळे चर्चेत आलेला ‘Are You Dead?’ हा अॅप आता टेक विश्वात गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या तीन तरुण डेव्हलपर्सनी सुमारे १००० युआन, म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे १३ हजार रुपयांच्या खर्चात हा अॅप तयार केला. मात्र सध्या या अॅपचे मूल्यांकन १ कोटी युआन, म्हणजे जवळपास १३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
सुरुवातीला हा अॅप केवळ व्हायरल ट्रेंड म्हणून पाहिला जात होता. ‘Are You Dead?’ हे नावच लोकांचे लक्ष वेधून घेत होते. एक बटण आणि विचित्र प्रश्न एवढ्यावर अॅपची ओळख मर्यादित होती. मात्र आता या अॅपभोवती स्टार्टअप, स्केलिंग, महसूल मॉडेल आणि रिब्रँडिंग यासारख्या गंभीर बाबींची चर्चा सुरू झाली आहे.
हा अॅप नेमका कसा काम करतो, हे पाहिले तर त्याची साधेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. वापरकर्त्याने दर २४ ते ४८ तासांत एकदा ‘I Am Alive’ किंवा ‘I Am Ok’ असा चेक-इन करायचा असतो. सलग दोन दिवस चेक-इन न झाल्यास, वापरकर्त्याने आधी निवडलेल्या आपत्कालीन संपर्कांना ई-मेलद्वारे अलर्ट पाठवला जातो. अॅप कोणतेही लोकेशन ट्रॅकिंग करत नाही, अतिरिक्त परवानग्या मागत नाही, फक्त चेक-इन सिग्नलवर आधारित हा संपूर्ण मेकॅनिझम काम करतो.
व्हायरल झाल्यानंतर अॅपच्या ऑपरेशनल खर्चात मोठी वाढ झाली. सर्व्हर, नोटिफिकेशन सिस्टीम, ई-मेल डिलिव्हरी आणि युजर सपोर्ट यासाठी खर्च वाढू लागल्याने हा अॅप फ्री मॉडेलमधून पेड मॉडेलकडे वळवण्यात आला. सध्या या अॅपची किंमत सुमारे ८ युआन, म्हणजेच जवळपास १०० रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत मुद्दामच कमी ठेवण्यात आली असून, ‘इम्पल्स डाउनलोड’ वाढवण्याची ही रणनीती असल्याचे मानले जाते.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेचा विचार करता ‘Are You Dead?’ हे नाव काहीसे अस्वस्थ करणारे ठरू शकते, याची जाणीव डेव्हलपर्सनाही झाली आहे. त्यामुळे हा अॅप आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डेमुमु’ या नव्या नावाने रिब्रँड करण्याची तयारी सुरू आहे. शॉक व्हॅल्यूवर आधारित ओळख सोडून आता युटिलिटी आणि सेफ्टी अॅप म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या अॅपच्या यशामागे केवळ टेक्नॉलॉजी नाही, तर चीनमधील बदलता सामाजिक वास्तव मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अहवालांनुसार चीनमध्ये २०० दशलक्षांहून अधिक लोक एकटे राहतात. मोठ्या शहरांतील तरुण व्यावसायिक आणि एकटे राहणारे वृद्ध नागरिक यांच्यासाठी ‘काही घडलं तर कुणाला कळेल?’ ही चिंता वास्तविक आहे. याच सामाजिक गरजेतून या अॅपला मोठ्या प्रमाणावर स्वीकार मिळाला आहे.
आज हा अॅप चीनच्या अॅप स्टोअरमधील पेड चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर दिसत असून, हळूहळू इतर देशांतील अॅप स्टोअर्समध्येही तो उपलब्ध होत आहे. त्यामुळे अवघ्या १३ हजारांत तयार झालेली ही कल्पना आता केवळ व्हायरल ट्रेंड न राहता, एक गंभीर आणि संभाव्य ग्लोबल स्टार्टअप म्हणून पुढे येताना दिसत आहे.
------------------------------------
