थंडीने गारठलेल्या नागपुरात राजकारण तापलं !


आरोप-प्रत्यारोप, सत्ताधारी-विरोधक आमने सामने

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपुरात सुरुवात होत असताना, वातावरणात उत्तरेकडून येणारी थंडी आणि राजकारणातून निर्माण झालेली राजकीय उष्णता दोन्हींचा तुफान संगम पाहायला मिळत आहे. नागपूरच्या किमान तापमानाने ८ अंशांपर्यंत घसरून "हिल स्टेशन"ची अनुभूती देत असताना विधानभवन परिसर मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी पेटलेलं दिसत आहे.

कुंभमेळ्यासाठी झालेल्या वृक्षतोडीपासून जमीन घोटाळ्यापर्यंत, शेतकऱ्यांची कर्जमाफीपासून महिला अत्याचारांपर्यंत विरोधकांनी सरकारला चौफेर घेरण्याची तयारी केली आहे. चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी “शेतकरी हवालदिल, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न आणि प्रशासनातील ढिसाळ कारभार” या मुद्द्यांवर सरकारवर थेट हल्लाबोल केला.

मात्र, काही वेळातच सरकारकडून जोरदार प्रतिउत्तर दिले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत “विरोधकांची पत्रकार परिषद निराशेने भरलेली होती. त्रागाच जास्त, तथ्य कमी होती असे स्पष्ट केले. काँग्रेस प्रामाणिक होता अशी उपरतीही त्यांच्यात दिसली,” अशा शब्दांत खोचक टोले मारत पलटवार केला. “शनिवार–रविवारीही कार्यवाही होणार आहे. पळून जाण्याची मानसिकता सरकारची नाही. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही सामर्थ्याने उत्तर देणार,” असा ठाम संदेश सरकारने दिला.

दरम्यान, नागपूरच्या कडाक्याच्या थंडीनेही राजकीय तापमानाला अजिबात आळा बसलेला नाही. आज ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु विधानभवनात मात्र राजकीय शेरेबाजीमुळे तापमान उलट वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

उपस्थितीत येणाऱ्या मिनिटागणिक हालचाली, चर्चा, आकडेमोड, रणनीती, विधानसभेत होणाऱ्या तुफानी चर्चांमुळे नागपूर केवळ ‘विंटर कॅपिटल’ नाही तर राज्य राजकारणाचं ‘Power Capital’ ठरणार हे निश्चित.

एकीकडे विदर्भातील नागरिकांना थंडीची हुडहूड, आणि दुसरीकडे सभागृहात होणाऱ्या उष्ण चर्चांचा उकाडा यामुळे नागपूर 2025 चं हिवाळी अधिवेशन विशेष गाजण्याची चिन्ह दिसत आहे.



----------









Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने