नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या नेहा संतोष पवार (वय 24) हिने 27 नोव्हेंबर रोजी सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करत आपलं जीवन संपवल्यानंतर संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारे तथ्य समोर आले आहे. मृत्यूपूर्वी नेहाने तब्बल सात पानांची सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवली होती, ज्यामध्ये सासू, नवरा आणि नणंदांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक अत्याचारांचे धक्कादायक तपशील नमूद केले आहेत. पोलिस तपासादरम्यान घरझडती घेताना सासरच्या घरातील एका भिंतीवर बिब्बा आणि त्याला नागाच्या आकाराचा खिळा ठोकलेला आढळून आला असून, याद्वारे नेहाला जादूटोणाची भिती दाखवली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले असून नेहाचा पती, सासू आणि तीन नणंदांना अटक करण्यात आली आहे.
नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये अत्यंत वेदनादायक वास्तव स्पष्ट करत लग्नानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी, पैशांसाठी दबाव, घरकाम, वर्तन आणि पतीसंबंध ठेवण्याबाबत अवास्तव आरोपांमुळे सतत मानसिक छळ केल्याची नोंद केली आहे. "सील ब्लड निघाले नाही म्हणून 15–20 दिवस नवऱ्याने संशय घेतला, नंतर निघाले तेव्हा शांत झाला," असे नेहाने लिहिले असून तिच्या मासिक पाळीबाबतही सासरकडून संशय घेऊन नणंद व पतीने तपासणी केल्याचा धक्कादायक उल्लेख केला आहे. पतीचे विवाहापूर्वीच एका युवतीशी प्रेमसंबंध असून त्याचे अश्लील फोटो स्वतः पतीने नेहाला दाखवले होते, असेही तिने नमूद केले आहे. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पैशांची मागणी होत राहिली आणि माहेरहून 20 हजार रुपये आणल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तिने लिहिले आहे. दिवाळीसाठी माहेरी पाठवूनही दहाव्या दिवशीच सासू व नवऱ्याने परत बोलावून गैरसोयीची वागणूक दिली, तर जादूटोण्याच्या नावाने घाबरवून मानसिक त्रास देत, तोडफोड केल्याचा उल्लेख तिने केला आहे. “माझे नशीब खराब आहे, मला सासर चांगले मिळाले नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे,” या शब्दांत नेहाने आपल्या यातनांचा शेवट केला.
नेहाचा मृत्यू ही आत्महत्या नसून दीर्घकाळाच्या सासरकडून झालेल्या मानसिक, वैवाहिक, आर्थिक आणि जादूटोणा-आधारित छळाचा परिणाम असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून न्याय मिळेपर्यंत कारवाई थांबणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर या प्रकरणाने नाशिकमध्ये पुन्हा हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार व जादूटोणा या त्रासदायक सामाजिक वास्तवावर चिंतनाचा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
---------
हेही वाचा
ती चाचणी, नवऱ्याचे ते फोटो अन्... ६ महिन्यांत नवविवाहितेने संपवलं जीवन !
