नाशिक : नवविवाहितेने सात पानांची चिठ्ठी लिहून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असे मृत महिलेचे नाव असून विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांत तिने आपले जीवन संपवले. “भाऊ, तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं पण माझं नशीब खराब. रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे,” असे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. नेहाच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून सुसाईड नोटमध्ये पती, सासू आणि नणंदीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाची तपशीलवार नोंद करण्यात आली आहे. तिने केलेल्या तक्रारी आजच्या आधुनिक काळातही बुरसटलेल्या पारंपारिक विचारसरणीच्या मानसिकतेचे किडस वाणी दर्शन घडवतात,
नेहाचा विवाह ४ जून २०२५ रोजी संतोष पवार याच्याशी झाला होता. भावाने १५ लाख रुपयांचा खर्च करून धुमधडाक्यात हा सोहळा केला, तसेच पतीला सोन्याची व चांदीची अंगठी करण्यात आली होती. लग्नाच्या एका महिन्यानंतरपासूनच पती, सासू व नणंदे कडून विविध कारणांवरून तिचा छळ सुरू झाला. मानसिक त्रासाचे प्रमाण इतके वाढले की पती व नणंदीकडून तिच्या कौमार्याची तपासणी करण्यास भाग पाडल्याचा संतापजनक उल्लेख तिने चिठ्ठीत केला आहे.
लग्न झाल्यानंतर शारीरिक संबंध झाल्यावर सील ब्लड निघत नाही म्हणून १५ ते २० दिवस चारित्र्यावर संशय घेत सतत बोलणे सुरूच राहिले, असे तिने लिहिले. नंतर रक्त निघाले तेव्हा नवरा शांत झाल्याचेही तिने नमूद केले. त्यानंतर ६ सप्टेंबरला मासिक पाळी आली तेव्हा सासूने “खोटे बोलते” असा संशय घेत नणंदेकडून पॅड लावून तपासायला भाग पाडले, इतकेच नव्हे तर पतीनेही तपासणी केली. यामुळे नेहावरचा मानसिक छळ आणखी वाढला.
नेहाच्या सुसाईड नोटनुसार तिच्या पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्या मुलीसोबतचे अश्लील फोटो स्वतः पतीने नेहाला दाखवले होते. घरातील नणंद सतत माहेरी येऊन राहत असल्यामुळे तिचे व तिच्या मुलांचे सगळे काम नेहाला करावे लागायचे. “काहीच काम करत नाही, सतत फोनवर असते, माहेरच्या लोकांशी खूप बोलते” असे कायम बोलत घरातील वातावरण नेहासाठी असह्य बनवले जात होते. नेहाच्या मते सासरची आर्थिक परिस्थिती खराब दाखवण्यात आली आणि त्यानंतर कुटुंबाकडून पैशांची मागणी केली जाऊ लागली. माहेरहून २० हजार रुपये आणून दिल्याची नोंद तिने चिठ्ठीत केली आहे. दिवाळीसाठी माहेरी पाठवले असतानाही अवघ्या दहा दिवसांत तिला सासरी बोलावण्यात आले.
नांदायला आल्यापासून दोन वेळा नवऱ्याकडून मारहाण केल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. “माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. माझे नशीब खराब, मला चांगले सासर मिळाले नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,” असे नेहाने लिहिले आहे. याशिवाय चिठ्ठी सासरच्या लोकांच्या हाती लागली तर ते पुरावा नष्ट करतील अशी भीतीही व्यक्त करत तिने चिठ्ठीचे फोटो काढून नातेवाईकांकडे वाचवण्यासाठी पाठवले होते.
घटनेची माहिती मिळताच भावाने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू झाला. पंचवटी पोलीस ठाण्यात नेहाच्या ७ पानांच्या सुसाईड नोटच्या आधारे पती संतोष पवार, सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पती, सासू आणि तिन्ही नणदांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास पुढे सुरू आहे.
ही घटना नवविवाहित महिलांवरील मानसिक व सामाजिक अत्याचाराचे पाशवी स्वरूप पुन्हा समोर आणणारी ठरली आहे. चारित्र्यावर संशय, कौमार्य तपासणी, आर्थिक मागणी, मोबाईल वापरावर निर्बंध आणि मुलीचे अस्तित्व नाकारण्याचे प्रकार आजही सुरु आहेत, याचे हे तीव्र आणि वेदनादायी उदाहरण ठरले आहे.
एका नवविवाहितेच्या आयुष्यात, कौमार्य चाचणी , पाळी तपासणी, चारित्र्यावर संशय, आर्थिक लूट, मानसिक छळ हे ६ महिन्यांत एकत्रितपणे घडणं हा समाजासाठी लाजिरवाणा प्रकार या घटनेत समोर आला आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील स्त्रियांवरील अधःपाताची भीषण झलक आहे. नेहाच्या मृत्यूचे उत्तर कोण देणार? आजही ‘चरित्र’ सिद्ध करण्याची जबाबदारी मुलीवरच का? असे अनेक समाजाला हादरवणारा प्रश्न या घटनेने निर्माण केले आहेत.
-----------------------------------------------------------
