नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार झालेला चक्रवाती वादळ ‘दितवाह’ आता वेगाने भारताच्या दिशेने सरकत असून दक्षिण भारतातील समुद्रकिनारी राज्यांमध्ये मोठी त्सुनामीसदृश स्थिती आणि प्रचंड नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) तातडीचा इशारा देत सांगितले आहे की ३० नोव्हेंबरपर्यंत हे चक्रीवादळ तमिळनाडू, आंध्र प्रदेश व पुदुचेरी किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा द्रुतगतीने तीव्र होत चक्रवाती वादळात परिवर्तित झाला आहे आणि वेगाने त्याची तीव्रता वाढत आहे.
IMD च्या माहितीनुसार मलक्का सामुद्रधुनीत बनलेले चक्रवात ‘सेनयार’ भारताच्या प्रभाव क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर गेले असून आता मलेशिया व सुमात्रा दिशेने निघाले आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात तयार झालेला आणखी एक कमी दाबाचा पट्टा चक्रवाती वादळ ‘दितवाह’मध्ये परिवर्तित झाला आहे. हे वादळ सध्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात सक्रिय असून चेन्नईपासून अंदाजे ७०० किलोमीटर आग्नेयेस पोट्टुविल परिसरात स्थित आहे. 30 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत हे वादळ उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने सरकत तमिळनाडू पुदुचेरी दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडक देईल, असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
दितवाह चक्रवातामुळे 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान तमिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून 28 आणि 29 नोव्हेंबरला काही भागात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तटीय आंध्र प्रदेश, यनम आणि रायलसीमा येथे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज असून 30 नोव्हेंबर रोजी काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चेन्नई, नागपट्टिनम, तिरुवल्लूर, तंजावूर यांसह तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांसाठी IMD ने 27, 28 आणि 29 नोव्हेंबरसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
देशाच्या उत्तर व पूर्व भागात सध्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर थंडीची लाट वाढेल आणि सकाळी दाट धुके पसरू शकते. 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे सकाळच्या वेळी दाट धुके अपेक्षित आहे. 30 नोव्हेंबरपासून 1 डिसेंबरदरम्यान पूर्व राजस्थानमध्ये थंडी वाढेल, तर पंजाबमध्ये 28 व 29 नोव्हेंबरला तर राजस्थानमध्ये 3 व 4 डिसेंबर रोजी थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
चक्रवाताचे नाव ‘दितवाह’ यमन या देशाने उत्तर हिंद महासागरातील चक्रवातांच्या नामसूचीप्रमाणे सुचविले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्रात प्रचंड लाटा यांच्या पार्श्वभूमीवर तटीय भागातील जनजीवन, पायाभूत सुविधा आणि मत्स्य व्यवसायास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते.
-----------------------------------------------

