शाही, रोषणाईच्या प्रकाशात गरीबाचे बँक खाते बनले काळ्या पैशाच्या धंद्याचे 'ट्रान्झिट पॉईंट’
नवी दिल्ली : देशात मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर पैशांच्या खेळाने किती भयानक रूप घेतले आहे, याचा धक्कादायक नमुना एका डेस्टिनेशन वेडिंगने देशासमोर आणला आहे. बेताच्या आर्थिक स्थितीत जगणाऱ्या एका साध्या रॅपिडो ड्रायव्हरच्या बँक खात्यात तब्बल 331 कोटी 36 लाख रुपये जमा झाल्याचा खुलासा झाला आहे. घराच्या दुरुस्तीसाठीही हातात पैसे नसलेला माणूस, आणि दुसरीकडे त्याच्या बँक खात्यातून करोडोंचा व्यवहार हा योगायोग नसून ब्लॅक मनीचा राक्षसी व्यापार असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
ईडीच्या सायबर आणि आर्थिक गुन्हे तपासदरम्यान एक संशयास्पद बँक खाते आढळले. 19 ऑगस्ट 2024 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत या खात्यात शेकडो संशयास्पद व्यवहारांनी 331 कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे दिसले. तपासाअंती कागदोपत्री खातेदार एक रॅपिडो ड्रायव्हर ज्याची मासिक कमाई महिनाभर पुरणार नाही इतकी कमी. हे शक्यच कसे? याच शोधातून उघड झाला देशातील ब्लॅक मनीचा नवा, आणि सर्वात धोकादायक चेहरा.
तपासानुसार हा संपूर्ण पैशांचा व्यवहार 1xBet नावाच्या बेटिंग ॲपच्या नेटवर्कशी जोडलेला होता. या ॲपशी संबंधित सिंडिकेटने ड्रायव्हरच्या खात्याचा वापर “म्यूल अकाउंट” म्हणून केला. म्यूल अकाउंट म्हणजे गुन्हेगारांचा गैरकायदेशीर पैसा पांढरा करण्यासाठी वापरले जाणारे निरपराध व्यक्तीचा बँक खाते.
मुळात ड्रायव्हरला स्वतःच्या खात्याचा गैरवापर झाल्याची कल्पनाही नव्हती. करोडोंच्या रकमांची ये-जा झाली, मोठ्या लग्नाचा खर्च झाला, आणि खातेदार आपल्या परिस्थितीत बदल न होता परत गरीबीशी संघर्ष करत राहिला. हा पैशांचा प्रवाह हे स्पष्ट दाखवतो की बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना सामान्य नागरिकांच्या खात्यांचा कवच म्हणून वापर केले जात आहे.
या प्रकारानंतर नंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला असून आता, ब्लॅक मनीचा संपूर्ण प्रवाह कुठून सुरू झाला? किती बँक खाती म्यूल अकाउंट म्हणून वापरली गेली? या रॅकेटचे मास्टरमाइंड कोण? पैशाचा स्त्रोत आणि अंतिम मालक कोण? आदी बाबींचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे 331 कोटींच्या काळ्या पैशाचा वापर उदयपूरातील ताज अरावली रिसॉर्टमध्ये झालेल्या भव्य डेस्टिनेशन वेडिंगमध्ये करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या शाही सोहळ्यात बॉलिवूडपासून ग्लोबल सेलिब्रिटीपर्यंत अनेक मोठी नावे उपस्थित होती. लग्झरी आणि रोषणाईच्या प्रकाशात एका गरीब ड्रायव्हरच्या आयुष्याचा बँक खाते काळ्या पैशाच्या धंद्याचे ट्रान्झिट पॉईंट बनले हेच या प्रकरणाची सर्वात मोठी विडंबना ठरली आहे.
डिजिटल इंडिया, अर्थव्यवस्थेशी जनतेचा थेट सहभाग, जन-धन खाते या सर्वांचा गैरफायदा घेत आर्थिक गुन्हेगारी सिंडिकेट देशातील गरीब, असंघटित कामगार आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आहे. छोट्या अमिषाच्या बदल्यात किंवा पूर्णपणे अनभिज्ञ अवस्थेत त्यांना गुन्हेगारांच्या पैशांच्या व्यवहाराचे माध्यम बनवले जात आहे.
331 कोटींचा हा खुलासा फक्त आकडा नाही. तो देशातील आर्थिक गुन्ह्यांच्या विक्राळ रूपाची धोक्याची घंटा आहे.
ईडीची तपासणी सुरू असून या नेटवर्कशी संबंधित अधिक मोठी नावे व आर्थिक गुन्ह्यांचे अड्डे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------
