कायदा मोडला तर… कंटेंट क्रिएटर्सला मोठा इशारा!
नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीसोबत व्हिडिओ तयार करून अश्लील स्वरूपाचा कंटेंट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून अलीकडेच अटक झालेल्या ‘10 रुपये वाला बिस्कुट कितने का है जी’ या व्हायरल व्हिडिओच्या निर्माते शादाब जकाती प्रकरणाने आता सोशल मीडिया व YouTube कंटेंट क्रिएटर्समध्ये मोठी चर्चा निर्माण केली आहे. मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज आणि व्हायरलिटी मिळवण्याच्या स्पर्धेत अनेकजण कंटेंट बनवताना मर्यादा विसरत आहेत आणि थेट कायदा मोडण्यापर्यंत पोहोचत आहेत.
शादाब जकाती यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगी दाखवत अश्लील कंटेंट तयार केल्याचा आरोप आहे. व्हिडिओ काही तासांत इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, मात्र त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना अटकेत घेतले. सध्या जकाती यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी प्रकरण गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे.
सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स किंवा इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांनी हा प्रकार एक मोठा इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे. ऑनलाइन कंटेंट तयार करताना कायदा, सार्वजनिक नैतिकता, सामाजिक शांती, संवेदनशीलता आणि अल्पवयीनांच्या संरक्षणासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. केवळ प्रसिद्धी आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या स्पर्धेत अनेक कंटेंट क्रिएटर्स जाणूनबुजून विवादित आणि अनुचित व्हिडिओ तयार करतात; मात्र असे प्रयत्न थेट अटकेपर्यंत पोहोचू शकतात याची जाणीव असणे आवश्यक आहे.
2025मध्ये अशा प्रकारे कंटकेंटच्या नावाखाली कायदा मोडणाऱ्या अनेक Youtubers आणि इन्फ्लुएन्सर्सविरोधात कारवाई केली गेली आहे. शादाब जकाती व्यतिरिक्त रनवीर अलाहाबादिया, आमीर आणि इतर काही कंटेंट क्रिएटर्सवर अभद्र भाषा, समाजविरोधी संदेश, अश्लीलता आणि दिशाभूल करणारा कंटेंट पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मुक्त अभिव्यक्तीचा भाग असला तरी कायद्यापेक्षा वर कोणी नसते. त्यामुळे 2025 मध्ये वाढलेल्या कारवाया आणि अटक प्रकरणांनी हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही कायदेशीर व नैतिक मर्यादा पाळणे अत्यावश्यक आहे अन्यथा व्हायरल व्हिडिओ थेट जेलच्या दारात घेऊन जाऊ शकतो.
----------------------------------------------------
