गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या नेमका फरक
भारतात गुंतवणूकदारांमध्ये ETF (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) आणि म्युच्युअल फंड या दोन्ही साधनांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी रकमेत सुरुवात करून विविध सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असल्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात हे दोन्ही पर्याय महत्त्वाचे बनले आहेत. परंतु अनेक गुंतवणूकदारांना या दोन्ही साधनांतील फरक समजत नसल्याने योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यात अडचणी येतात. ETF हे प्रामुख्याने पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड असतात, जे एखाद्या विशिष्ट इंडेक्स किंवा मालमत्तेचा परफॉर्मन्स जसा आहे तसाच ट्रॅक करतात. दुसरीकडे, म्युच्युअल फंड गुंतवणूक तज्ज्ञांकडून सक्रियरीत्या व्यवस्थापित केले जातात आणि मार्केटपेक्षा अधिक चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे गुंतवणूक पद्धत, खर्च, कर लाभ आणि रिस्क या सर्व बाबतीत दोन्हीमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो.
ETF मध्ये ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंजवर सामान्य शेअर्सप्रमाणेच होत असल्याने गुंतवणूकदार बाजार उघडा असताना कोणत्याही क्षणी खरेदी किंवा विक्री करू शकतात. किंमत दिवसात सतत बदलत असल्याने लिक्विडिटी अधिक मिळते. ETF कमी खर्चात व्यवस्थापित होत असल्याने एक्स्पेन्स रेशो तुलनेने कमी असतो आणि कराच्या दृष्टीनेही ते अधिक फायदेशीर मानले जातात. कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याची संधी असल्यामुळे नवशिक्या गुंतवणूकदारांसाठीही ETF सोयीचे ठरतात.
याउलट, म्युच्युअल फंडातील व्यवहार दिवसातून फक्त एकदाच बाजार बंद झाल्यानंतरच्या NAV (नेट अॅसेट व्हॅल्यू) प्राइसवर होतात. सक्रिय व्यवस्थापनामुळे मॅनेजमेंट फी तुलनेने जास्त असते, तरी म्युच्युअल फंडांमध्ये अधिक डाइवर्सिफिकेशन उपलब्ध असल्याने विविध सेक्टर्स, अॅसेट क्लासेस आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची व्यापक संधी मिळते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, SIP स्वरूपात शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याची सुविधा देखील म्युच्युअल फंडांना अधिक आकर्षक बनवते. ETF जरी इंडेक्स-आधारित आणि टार्गेटेड गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत असले तरी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या रिस्क प्रोफाइल, आर्थिक ध्येय आणि बाजारातील परिस्थितीनुसार मोठ्या पर्यायांची श्रेणी उपलब्ध करून देतात.
शेवटी, ETF आणि म्युच्युअल फंड यापैकी कोण चांगला हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांवर, कालावधीवर, रिस्क घेण्याच्या क्षमतेवर आणि गुंतवणूक पद्धतीवर अवलंबून आहे. कमी खर्च, सोपी लिक्विडिटी आणि मार्केटसमान परफॉर्मन्स हवे असणाऱ्यांसाठी ETF उपयुक्त ठरू शकतात, तर जास्त परताव्याच्या अपेक्षांसह दीर्घकालीन उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड जास्त फायदेशीर ठरू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी दोन्ही पर्यायांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूनच निर्णय घेणे हितावह आहे.
------------------------------------------------
