‘हुंडा प्रथेने विवाह व्यवहार झाला’ – सर्वोच्च न्यायालयाची खंत!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विवाहात हुंडा देणे - घेणे याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले की हुंड्याच्या सामाजिक व्याधीने विवाहासारख्या पवित्र आणि मूल्यपूर्ण संस्थेचे रूपांतर दुर्दैवाने एका व्यावसायिक व्यवहारात झाले आहे. नुकतेच न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर एक असा खटला होता ज्यात विवाहाला अवघे चार महिने झाल्यानंतरच नववधूची इंडियाच्या मागणीसाठी विषप्राशन करून हत्या करण्यात आली. खंडपीठाने स्पष्ट केले की विवाहाचे वास्तविक स्वरूप हे आपापसातील विश्वास, साहचर्य आणि परस्पर आदरावर आधारित असते; परंतु हुंड्याच्या दुष्ट प्रथेमुळे हा पवित्र संबंध भौतिक लोभ आणि प्रतिष्ठेच्या दिखाव्यासाठी झालेल्या व्यवहारात बदलला आहे. 

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की हुंडाबळी ही केवळ एका व्यक्तीविरुद्ध नसून संपूर्ण समाजाविरुद्धची अमानुष आणि जघन्य गुन्हेगारी कृती आहे, जी स्त्रीची समानता, सन्मान आणि सुरक्षित जीवनाचा अधिकार हिरावून घेते. खंडपीठाने पुढे टिप्पणी केली की हुंड्याला अनेकदा ‘भेट’ किंवा ‘स्वेच्छा देणगी’ असे नाव देऊन समाजात वैधतेचे आवरण घालण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु प्रत्यक्षात ते भौतिक लोभ भागवण्याचे साधन बनले आहे.

हुंडाबळीच्या घटना या कुप्रथेची सर्वात विद्रूप अभिव्यक्ती असून एका तरुणीचा जीव तिच्या कोणत्याही चुकीमुळे नव्हे तर इतरांच्या अतृप्त लालसेला तृप्त करू न शकल्यामुळे हरवत आहे हे अत्यंत भीषण असल्याचे कोर्टाने नमूद केले. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरोपीस दिलेली जामिन रद्द करत उच्च न्यायालयाचा आदेश “अव्यावहारिक आणि प्रतिकूल” असल्याचे स्पष्ट केले, कारण त्यात आरोपाची गंभीरता, पीडितेने मृत्यूपूर्व दिलेली ठोस साक्ष आणि हुंडाबळीशी संबंधित कायदेशीर गृहितकांची पुरेशी दखल घेण्यात आलेली नव्हती. 

न्यायालयाने असेही म्हटले की अशा गुन्ह्यांमुळे मानवी गौरवाची मूलतत्त्वे खिळखिळी होतात आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 व अनुच्छेद 21 मध्ये अधिष्ठित समानता आणि सन्मानपूर्वक जीवनाच्या हमीचे उघड उल्लंघन होते. सर्वोच्च न्यायालयाची ही कठोर आणि स्पष्ट टिप्पणी समाजापुढे पुन्हा हुंडा प्रथेविरोधात कठोर पाऊले उचलण्याची गरज अधोरेखित करते आणि विवाह या पवित्र बंधनाला लोभ व व्यवहारापासून मुक्त करणे ही सामूहिक सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव करून देते.


-----------------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने