ग्लोबल वार्मिंगचा फटका, तज्ज्ञांचा गंभीर इशारा
नवी दिल्ली : हवामानातील झपाट्याने घडत असलेल्या बदलांचा गंभीर परिणाम आता हिमालय पर्वतरांगांवर स्पष्टपणे दिसत आहे. वर्षभर पांढऱ्या बर्फाच्या दुलईने झाकलेले उंच शिखरे आता काळसर आणि उघडी-बोडकी दिसू लागली आहेत.
हायर हिमालयात बर्फवृष्टी दीर्घकाळ न झाल्याने हजारो फुटांच्या उंचीवरील दऱ्यांवरही बर्फाचा मागमूस राहिलेला नाही. कडाक्याची थंडी असताना देखील पर्वतांवर बर्फ दिसणे दुर्मिळ झाले आहे, आणि यामुळे ग्लेशियर वेगाने वितळत असून तुटण्याचा वेगही चिंताजनकरीत्या वाढला आहे. हिमालय जगातील सर्वांत उंच आणि संवेदनशील पर्वतरांग असूनही गेल्या दहा वर्षांत तापमान तब्बल तीन अंशांनी वाढले आहे.
वाढत्या पाऱ्याचा वेग जागतिक स्तरावर हिमालय प्रदेशात सर्वाधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट होत आहे, आणि ही परिस्थिती कायम राहिली तर पुढील काळात पर्यावरणीय संतुलनाची अवस्था गंभीरपणे बिघडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ज्येष्ठ संशोधकांच्या मते ग्लोबल वार्मिंगमुळे हिमालय पर्वतरांगांचा भूगोल वेगाने बदलत असून पर्वत दरवर्षी सुमारे १० मिलीमीटरने वर जात आहेत. हिमालय हा जगातील जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांपैकी एक असल्यामुळे या बदलांचा थेट परिणाम कोट्यवधी लोकांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मानवी हस्तक्षेप, बांधकामे आणि प्रचंड प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे पर्यावरणावर होत असलेला ताण या हवामान बदलास अधिक वेग देत आहे.
हिमालयातील संवेदनशील भूभागावर नियंत्रणहीन विकासामुळे परिसंस्था अस्थिर होत असून त्यातून भूस्खलन, पूर, जलस्रोतांचा नाश आणि पाण्याच्या टंचाईचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः गंगोत्री ग्लेशियर दरवर्षी १५ मीटरने मागे सरकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्यावरण मंत्रालयाचे माजी सचिव हेम पांडे यांच्या म्हणण्यानुसार हिमालयाचे सर्वाधिक शोषण गेल्या दोन दशकांत झाले असून अत्याधिक बांधकामामुळे संपूर्ण भूप्रदेशाचा नकाशाच बदलला आहे.
हिमालय प्रदेशात गेल्या वीस वर्षांतील पावसात १५ टक्क्यांची घट नोंदली गेली आहे, तर गेल्या दहा वर्षांत मध्य हिमालयातील दोनशेहून अधिक जलस्रोत पूर्णतः आटले आहेत. यामुळे पिण्याचे पाणी, शेती आणि रोजगाराला गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. सध्याची स्थिती पाहता योग्य पर्यावरणीय नियोजन, जलसंवर्धन आणि विकासावर नियंत्रण यांसाठी तातडीची उपाययोजना न केल्यास मानवी आरोग्य, जीवनमान आणि नैसर्गिक संसाधनांसाठी मोठे संकट ओढवण्याची तज्ज्ञांची स्पष्ट इशारा दिला आहे. हिमालयातील हवामानाचा हा वेगाने बदलणारा चेहरा संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी भविष्यातील आपत्तीचे संकेत देत आहेत.
---------------------------------------------
