माजी खासदार कुमार केतकर यांचा सनसनाटी दावा
नवी दिल्ली : संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मोठ्या पराभवाबाबत केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
2004 मध्ये काँग्रेसला 145 जागा आणि 2009 मध्ये विक्रमी 206 जागा मिळाल्यानंतर 2014 मध्ये पक्षाचा आकडा थेट 44 वर कसा काय आला, याबाबत केवळ जनमत लाट किंवा विरोधाची भावना कारणीभूत नव्हती, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे काही जागतिक शक्तींना पसंत नव्हते, असा ठाम आरोप त्यांनी मांडला.
कुमार केतकर यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस 2014 मध्ये पुन्हा बहुमताच्या जवळ जाणार, कदाचित 250 पेक्षा अधिक जागा मिळवून परत सत्तेत येणार असे संकेत होते. परंतु काही शक्तींनी "काँग्रेसला काहीही करून वाढू देऊ नये" असा डाव आखला. या कटाचा सूत्रधार म्हणून त्यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था CIA आणि इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद यांचा थेट उल्लेख केला.
या दोन संस्थांना काँग्रेसप्रणीत सरकार भारतात परत आल्यास त्यांच्या हितसंबंधांना धक्का बसेल, असा अंदाज होता, म्हणून 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला खाली खेचण्याची रणनीती राबवली, असा दावा त्यांनी केला.
मोसादने निवडणुकीचे स्ट्रक्चर तयार केले, प्रत्येक मतदारसंघाचे बारकाईने विश्लेषण केले आणि भारतातील परिस्थिती स्वतःच्या फायद्याची राहील यासाठी रणनीती आखली, असे केतकर यांनी कार्यक्रमात म्हटले. त्यांनी असेही स्पष्ट केले की मोसादला कमी लेखता कामा नये, तसेच ती सर्वशक्तिमान आहे असेही म्हणता येणार नाही, पण निवडणूक परिणामांमध्ये हस्तक्षेप करण्याइतकी क्षमता व प्रभाव त्यांच्याकडे आहे.
CIA आणि मोसाद या दोन्ही गुप्तचर संस्थांच्या योजनेमुळेच काँग्रेसच्या जागा 206 वरून घसरून 44 वर आल्या, अन्यथा इतका मोठा पराभव केवळ नाराजी आणि जनमतामुळे शक्य नव्हता, असेही ते म्हणाले.
या विधानानंतर राजकीय क्षेत्रात नवी चर्चा रंगली असून केतकर यांच्या आरोपांवर काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. 2014 च्या पराभवामागे आंतरराष्ट्रीय कट असल्याचा थेट आरोप प्रथमच इतक्या स्पष्ट शब्दांत केला गेल्याने देशाच्या राजकीय वातावरणात नवी हलचल निर्माण झाली आहे.
------------
