आता 20 डिसेंबरला मतदान 21 ला मतमोजणी बदलामुळे प्रचारयुद्धाला ब्रेक
मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यावर नेमका हा निर्णय घेतल्याने कार्यकर्ते, उमेदवार आणि राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन प्रक्रियांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत असून गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा वेगवान धुरळा एकाएकी स्थिरावला आहे.
पुढे ढकललेल्या 22 ठिकाणांमध्ये आता 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे, तर उर्वरित नगरपरिषदांमध्ये निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरलाच होणार आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या मोठ्या आयोजित करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीडमधील सभा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर व संभाजीनगर येथील सभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्हा तसेच नाशिकच्या भगूरमधील सभा अशा प्रचारयुद्धामुळे निवडणूक रंगत शिगेला पोहोचली होती. परंतु अनपेक्षित निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर राजकीय वातावरणात संभ्रमाचे पडसाद उमटत आहेत.
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील 17 पालिकांच्या कार्यक्षेत्रातील 38 प्रभागांची निवडणूकही पुढे ढकलली गेली आहे. अर्ज छाननीदरम्यान संबंधित उमेदवारांनी घेतलेल्या हरकती, अधिकाऱ्यांचा निर्णय मान्य नसल्याने झालेल्या न्यायालयीन लढाया, न्यायालयाचा निकाल 23 नोव्हेंबरनंतर लागणे, अर्ज माघारीची मुदत संपणे आणि त्यानंतर चिन्हवाटप प्रक्रियेत झालेला विलंब यामुळे प्रभावित भागात प्रचाराला पुरेसा कालावधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी उमेदवारांना आवश्यक वेळ मिळावा म्हणून निवडणूक लांबणीवर टाकण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
बारामती (पुणे), रेणापूर (लातूर), मंगळवेढा व अंजर (सोलापूर), महाबळेश्वर व फलटण (सातारा), यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, घुग्गुस (चंद्रपूर), देवळी (वर्धा), देऊळगावराजा (बुलढाणा), बाळापूर (अकोला), वसमत (हिंगोली), मुखेड व धर्माबाद (नांदेड), फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर), अंबरनाथ (ठाणे), कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी (अहिल्यानगर) या ठिकाणांतील अध्यक्षपदाच्या निवडणुकांना विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुका पुढे ढकलल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता असून पुढील 20 दिवसांत बदललेल्या परिस्थितीत प्रचार आणि समीकरणे कशी आकार घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-----------------------------------------------------
