विजातीय प्रेमप्रकरणातील सक्षम ताटे हत्येने राज्य हादरले
नांदेड : विजातीय प्रेमाला मृत्यूचा कहर सहन करावा लागला आणि अवघ्या 19-20 वर्षांच्या सक्षम ताटे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. सक्षमची प्रेयसी आंचल मामीलवाड हिच्या घरच्यांना या दोघांच्या नात्याचा विरोध होता, आणि त्या विरोधातूनच आंचलचे वडील आणि दोन भावांनी सक्षमवर गोळ्या झाडून तसेच डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. प्रेमसंबंधांमधून उभ्या राहिलेल्या या हत्याकांडाने राज्यभर खळबळ उडवली असताना, या प्रकरणावर आंचलने दिलेली खुली कबुली आणि तिचे अढळ प्रेम पाहून समाज चकित झाला आहे. सक्षमच्या मृत्यू नंतरही आंचलने त्याच्याशीच विधीवत लग्न केलं त्याच्या मृतदेहाला हळद लावली, त्याच नावाचं कुंकू कपाळावर भरलं आणि सर्वांसमोर स्वतःला सक्षमची पत्नी म्हणून स्वीकारलं.
आंचलने सक्षमचा जीव घेण्यात स्वतःच्या घरच्यांचा हात असल्याची धक्कादायक माहिती आणि संपूर्ण घटनाक्रम सांगताना अश्रू आवरत नव्हते. “सगळे म्हणायचे त्या मुलीचा नाद सोड, पण त्याने मला खूप जीव लावला. मग मी त्याची साथ कशी सोडू? तो नाही तरी त्याची साथ कधीच सोडणार नाही. माझ्यामुळे आणि माझ्या प्रेमामुळे त्यांचा मुलगा गेला, आता मी त्यांची साथ सोडू शकत नाही,” अशा शोकमग्न शब्दांत तिने आपला निर्धार व्यक्त केला. सक्षमच्या मृत्यू नंतर त्याच्या आईनेही आंचलला स्वीकारत “मी तिला मुलगी मानत नाही, माझा मुलगाच मानते; तिला सक्षमच समजून आयुष्यभर साथ देणार,” असा हृदय पिळवटणारा शब्द उच्चारला.
घटनेच्या आधीचा दबाव कसा होता हे मांडताना आंचलने सांगितले की, वर्षभरापूर्वी प्रेमाची माहिती घरच्यांना झाल्यानंतर वडील आणि भावांनी सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. “तू गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू,” अशा सततच्या धमक्या, शस्त्रांचा धाक आणि मानसिक छळ सुरू होता. अल्पवयीन असताना तिने दबावामुळे सक्षमविरोधात गुन्हा दाखल केला; मात्र 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिने स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली. “मी म्हणाले आपण पळून जाऊ, पण तो म्हणाला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो, त्यांना मनवूनच तुला घेऊन जाणार,” असे तिने सांगितले.
या खुनात केवळ कुटुंबातील सदस्यांचाच नव्हे, तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही समोर आलेला आहे. गुन्हा दाखल न करणाऱ्या आंचलच्या भावाला पोलिस स्टेशनातच पोलिस कर्मचारी धीरज कोमलवार याने “ज्याच्याबरोबर तुझ्या बहिणीचे लफडं आहे त्याला मारून ये,” असे भडकावल्याचे आंचलने सांगितले. घटनेच्या दिवशी आंचलला देवदर्शनाच्या नावाखाली मानवत येथे नेण्यात आले आणि तिच्या डोळ्यांपासून सत्य लपवले गेले. पोलिसांनी तिला काहीही न सांगता नांदेडला आणले आणि तेथे पोलिस स्थानकात सक्षमचा मृतदेहाचा फोटो दाखविला तेव्हा तिला सत्य समजले.
या हत्याकांडानंतर समाजातील विजातीय प्रेम, कौटुंबिक सत्ताधारी वृत्ती आणि महिलेच्या निर्णयक्षमतेवर होणारा बळजबरीचा दडपशाही विचारात घेण्यासारखा मुद्दा म्हणून पुढे आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सक्षमच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरणातील पोलिस कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली असून सक्षमचे पालक आणि आंचलला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही केली आहे. सक्षम ताटेवरील प्रेमाचा शेवट मृत्यूने झाला असला तरी, त्याच्या जागी उभ्या राहिलेल्या आंचलच्या प्रेमाचा निर्धार समाजाच्या मनाला खोल जखम करून गेला आहे.
हेही वाचा...
