सोलापूर : शहरातील तुळजापूर रोड परिसरात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी - पारधी समाजातील सात महिन्यांची गर्भवती महिला सौ. चकुली बजरंग शिंदे हिच्यावर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कथित मारहाण केल्याचा आणि तिचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत चकुली शिंदे यांच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सांगितले जात असून त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती समोर आल्यानंतर सामाजिक संघटनांसह आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पारधी समुदायाने व विविध सामाजिक संघटनांनी सरकारकडे या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९, भारतीय दंड संहिता आणि इतर दंडात्मक तरतुदींनुसार या प्रकरणात कठोर कारवाई अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय पीडित महिलेला तातडीची वैद्यकीय मदत, सुरक्षितता आणि आर्थिक भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र व जलद चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की, घटना कितीही संवेदनशील आणि गंभीर असली, तरी कोणत्याही प्रकारची अफवा पसरविण्याचा हेतू नसून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून पीडित महिलेला योग्य तो न्याय मिळावा, एवढीच मागणी ते करत आहेत. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेकडून अशा प्रकारच्या आरोपांची शहानिशा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सोलापूर पोलिस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या या घटनेची सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा करत आदिवासी व सामाजिक संघटनांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन या प्रकरणाची प्राथमिक माहिती गोळा करत असून अधिकृत प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
-----------------------------
