अनेक उमेदवार लढाईपूर्वीच विजयी; कोणत्या ठिकाणी कोण पहा यादी !
मुंबई : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीची शेवटची तारीख होती. अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अनेक ठिकाणी उमेदवार प्रत्यक्ष मतदानाआधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. अनेक नगरपरिषदांमध्ये राजकीय समीकरणे, गटबाजी, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव आणि परस्पर समन्वय यांमुळे प्रत्यक्ष लढाईची गरजच उरली नाही. काही ठिकाणी ‘कुणाची बायको’, ‘कुणाची मामी’, ‘कुणाचा भाचा’ अशा नातेसंबंधांवरून वर्चस्व बळकट करण्याची चर्चा रंगली असून अनेक उमेदवारांनी विरोधक नसल्याने आपला विजय साजरा केला आहे.
रायगड जिल्यातील पेण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. येथे भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मधील भाजपचे मालती म्हात्रे, स्मिता पेणकर, अभिराज कडू तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुशीला ठाकूर, वसुधा पाटील आणि दीपक गुरव हे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविना विजयी झाले.
शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे बिनविरोध निवडून आल्या. भाजपच्या अधिकृत उमेदवार मनिषा गोंदकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने माघार घेतल्याने छाया शिंदे यांना थेट विजय मिळाला.
परळी नगर परिषदेतही महायुतीला यश मिळाले असून शिंदे गटाच्या जयश्री गीते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रेश्मा बळवंत या प्रत्येकी एका प्रभागातून बिनविरोध विजयी झाल्या.
बारामती नगरपालिकेत यंदा पहिल्यांदाच आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या उमेदवारांना विरोधकांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने निर्विवाद विजय मिळाला. बारामतीतील नटराज कलादालन येथे नव्या नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले.
धुळे जिल्यातील दोंडाईचा नगरपालिकेत इतिहास घडला असून येथे नगराध्यक्षासह भाजपचे तब्बल 26 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत. सर्व विरोधकांनी एकमताने माघार घेतल्याने पूर्ण नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली आहे.
रायगडमधील पेण नगरपालिका निवडणुकीत छाननीदरम्यान काही अर्ज बाद झाल्याने अभिराज कडू आणि सुशीला हरिश्चंद्र ठाकूर हे दोन उमेदवारही बिनविरोध विजयी झाले.
जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या नगराध्यक्षपदी आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या; तर आज भाजपचे 10 नगरसेवकही बिनविरोध विजयी झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून येथे भाजपची सत्ता असून यंदाही विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचा विजय सहज निश्चित झाला.
अमरावती जिल्यातील चिखलदरा नगरपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले असून विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत अर्ज मागे घेतले.
राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत विविध पक्षांची चुरस असताना शिंदे गटाच्या अतुल देशमुख यांनी रणनीती आखत शिवसेनेच्या सुप्रिया पिंगळे यांना बिनविरोध निवडून आणले आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी विरोधकांची अनुपस्थिती, अंतर्गत समन्वय आणि राजकीय आघाड्यांचे गणित अशा विविध घटकांमुळे या निवडणुका अनेक प्रभागांत बिनविरोध पार पडल्या आहेत. राज्यातील अंतिम विजयी संख्येने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील नव्या घडामोडींना वेग दिला आहे.
--------------------------
