बाबा वेंगा या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या भाकितांबद्दल वर्षानुवर्षे चर्चा होत आली आहे. दरम्यान आता 2026 संदर्भात त्यांनी केलेले काही दावे पुन्हा समोर आले असून या भाकितांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. 2025 मधील काही घटनांबाबत त्यांनी केलेली भाकितं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या अनुयायांकडून केला जातो, त्यामुळे 2026 वर्षासाठी त्यांनी केलेल्या अंदाजांबद्दलची उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढली आहे. काही दिवसांतच 2026 या वर्षाची सुरूवात होणार असताना जगावर युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाने निर्माण होणाऱ्या मोठ्या आव्हानांची सावट दाटत असल्याचं बाबा वेंगा यांनी भाकित केल्याचे सांगितले जाते.
बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियामध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धाची आणि हिटलरच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती असा दावा प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला 9/11 दहशतवादी हल्ला, तसेच जपानला बसलेली त्सुनामी यांसारख्या अनेक घटनांबाबतच्या भाकितांमुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी त्यांनी हजारो वर्षांपर्यंतच्या भविष्याची नोंद करून ठेवली आहे असा दावा केला जातो.
2026 बद्दल बोलताना बाबा वेंगा यांनी काही अत्यंत चिंताजनक संकेत दिल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मते 2026 हे वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत कठीण ठरू शकते. जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, जागतिक पातळीवर तणाव वाढतील, मोठ्या देशांमध्ये संघर्ष भडकू शकतो असा दावा त्यांच्या भविष्यवाणीमध्ये आढळतो. अमेरिका आणि रशिया यांच्यात मोठा संघर्ष होईल, तर याच काळात एलिअन्सच्या हल्ल्याचादेखील इशारा त्यांनी दिल्याचे काही अहवालात म्हटले जाते. एआय तंत्रज्ञानाची वाढती ताकद जगाच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जगावर संकट निर्माण होऊ शकते, अशीही भविष्यवाणी त्यांनी केली असल्याचे सांगितले जाते.
नैसर्गिक आपत्तींबाबतही बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. जगातील अनेक भागांना प्रचंड भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, महापूर, आणि हवामानातील मोठे बदल यांचा सामना करावा लागू शकतो. एकूण भूभागातील 11 ते 12 टक्के भूभाग अशा संकटांनी गंभीरपणे प्रभावित होईल असे भाकीत त्यांच्या समर्थकांकडून पुढे आणले जात आहे. या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान होईल असा दावा केला जातो.
याचबरोबर चीन हा अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून उदयास येईल, आणि जागतिक समीकरणात मोठा बदल होईल, अशी भविष्यवाणीही बाबा वेंगा यांनी 2026 वर्षाबाबत केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामी वर्षात जागतिक पातळीवरील घडामोडी कशा बदलतील याबाबत अनेकांचा उत्सुकता आणि भीतीपूर्ण अंदाज सुरू झाला आहे.
[ वरील माहिती उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. या भविष्यवाण्यांच्या सत्यतेबाबत कोणताही दावा करण्यात येत नाही. अंधश्रद्धेला दुजोरा देण्याचा कोणताही उद्देश नाही.]
------------------------------
